बनावट इन्स्टाग्राम आयडीद्वारे महिलेचे अश्लील फोटो प्रसारित; फलटण शहर पोलिसांकडून दोघांना अटक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ७ जून २०२६ : सोशल मीडियावर बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करून एका महिलेचे मॉर्फ केलेले अश्लील व आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ आणि संदेश प्रसारित करून बदनामी करणाऱ्या दोघांना फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरण्यात आलेले चार मोबाईल हँडसेट आणि सहा सीमकार्ड असा २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७८, ७९, ३५६ (२) तसेच माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी), ६७ व ६७ (ए) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान आरोपीने दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने सीमकार्ड मिळवून विविध बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले होते. या अकाऊंटद्वारे मागील सहा महिन्यांपासून पीडित महिलेचे मॉर्फ केलेले आक्षेपार्ह व अश्लील फोटो, व्हिडिओ आणि संदेश फेसबुक, व्हॉट्सअॅप व इन्स्टाग्रामवर प्रसारित करून तिची व तिच्या पतीची बदनामी केली जात असल्याचे समोर आले.
पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने तांत्रिक तपास करून आरोपीने वापरलेले मोबाईल क्रमांक आणि बनावट इन्स्टाग्राम आयडींचा मागोवा घेतला. त्यातून प्रमोद सनद कांबळे (वय ३२, रा. लक्ष्मीनगर, फलटण) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने सुनील बाळू मोहिते (वय ३४, रा. याठार निंबाळकर, ता. फलटण) याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
तपासात सुनील मोहिते हा व्हीआय कंपनीचा सीमकार्ड विक्रेता असून त्याने दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने सीमकार्ड सक्रिय करून ते प्रमोद कांबळेला दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करून गुन्ह्यात वापरलेले चार मोबाईल हँडसेट आणि सहा सीमकार्ड जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

No comments