व्हीलचेअरवरून लोकशाहीचा मान राखला; 92 वर्षीय चिंतामण अहिवळे व 86 वर्षीय प्रल्हाद काकडेंचे मतदान
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० - फलटण नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. याचं उत्साहाचे जिवंत उदाहरण प्रभाग क्रमांक २, मंगळवार पेठ येथे पाहायला मिळाले. ९२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक चिंतामण कृष्णाजी अहिवळे यांनी व्हीलचेअरच्या साहाय्याने मतदान करत लोकशाहीतील आपला पवित्र हक्क बजावला.
वाढत्या वयामुळे चालण्यास अडचण असतानाही मतदान न करता राहणे त्यांनी मान्य केले नाही. मतदान केंद्रावर पोहोचून त्यांनी शांतपणे आपले मत नोंदवत उपस्थित मतदारांसमोर एक आदर्श ठेवला. त्यांच्या या कृतीमुळे मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.
तसेच, याच निवडणुकीत लोकशाहीप्रती असलेली निष्ठा अधोरेखित करणारी आणखी एक घटना घडली. वय ८६ असलेले प्रल्हाद बाबूराव काकडे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झालेली असतानाही, रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर थेट मतदान केंद्रावर येत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला असतानाही लोकशाहीच्या या पवित्र कर्तव्यास त्यांनी प्राधान्य दिले. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थित नागरिकांमध्ये कौतुकाची भावना निर्माण झाली असून, मतदानाबाबतचा जनजागृतीचा सकारात्मक संदेश समाजात गेला आहे.
ज्येष्ठ नागरिकांचाही लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग किती महत्त्वाचा आहे, याचे हे प्रेरणादायी उदाहरण असून, नव्या पिढीसाठीही हा एक सकारात्मक संदेश ठरतो. फलटण नगरपालिका निवडणुकीत नागरिकांचा वाढता सहभाग लोकशाही अधिक बळकट करत असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसून आले.

No comments