Breaking News

विडणीत धुमाकूळ घातलेल्या रानगव्याला वन विभागाने नैसर्गिक अधिवासात सोडले

Wild boar released into natural forest habitat in Vidini

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २८ फेब्रुवारी २०२६ - फलटण तालुक्यातील मौजे विडणी येथे दिनांक 27/02/2026 रोजी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास गवा या वन्यप्राण्याने ग्रामस्थ राजेंद्र सदाशिव जाधव (वय 69) यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बारामती येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    हल्ल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत फलटण वनविभागाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. गव्याचा शोध सुरू असताना कोकरेवाडी परिसरातील ऊसशेतीत गवा असल्याची खात्री झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात वनकर्मचाऱ्यांनी कडक बंदोबस्त ठेवत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.

    सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक वनसंरक्षक दिगंबर जाधव यांच्या नियोजनाखाली गवा रेस्क्यूसाठी बावधन, पुणे येथील रेस्क्यू टीम तसेच RRT कोल्हापूर टीम यांना पाचारण करण्यात आले.

    सुमारे 1.5 टन वजन असलेल्या गव्याचे रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत अवघड ठरले. प्रथम ड्रोन सर्व्हे करण्यात आला. त्यानंतर गव्याला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आले व सुरक्षितपणे रेस्क्यू व्हॅनमध्ये हलवून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. तब्बल 4.30 तासांच्या कठीण प्रयत्नांनंतर हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झाले.

    या रेस्क्यूदरम्यान फलटण, वडुज, दहिवडी व खंडाळा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी, अधिनस्त वनकर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी श्री. फाळके व श्री. पवार, पोलिस कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच विडणी गावचे पोलिस पाटील, सरपंच व ग्रामस्थांनीही रेस्क्यूदरम्यान प्रशासनास पूर्ण सहकार्य केले.

    वनविभागाच्या तत्परतेमुळे व समन्वयामुळे नागरिकांचा जीवित धोका टळला असून गव्यालाही सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश आले आहे.

No comments