बंद हातगाड्या व दुकानांच्या अतिक्रमणांवर फलटण नगर परिषदेचा बुलडोझर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ जून २०२६ : आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासह शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी फलटण नगर परिषदेने धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत शुक्रवारी माळजाई मंदिर परिसरातील खाऊगल्लीमध्ये बंद अवस्थेत असलेल्या हातगाड्या व दुकानांच्या अतिक्रमणांवर जेसीबीच्या साह्याने कारवाई करण्यात आली.
नगर परिषदेच्या पथकाने आज शुक्रवारी सकाळी ७ वाजता ही कारवाई करत रस्त्यावरील अडथळे हटविले. त्यामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असून, पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांना कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी प्रशासनाकडून नियोजनबद्ध पावले उचलली जात आहेत.
दरम्यान, या कारवाईमुळे बाधित झालेल्या हातगाडीधारक व अतिक्रमणग्रस्तांचे योग्य त्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली. तसेच शहरातील प्रमुख रस्ते आणि पालखी मार्ग पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ही मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments