Breaking News

फलटण नगर पालिकेसाठी ७०.२९ टक्के मतदान ; कोण होणार फलटणचा नगराध्यक्ष?

70.29 percent voting for Phaltan Municipal Corporation; Who will be the Mayor of Phaltan?

    फलटण गंधवार्ता वृत्तसेवा दि.२० - फलटण नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूकीत आज शनिवार, दिनांक २० डिसेंबर रोजी शांततेत पार पडली. एकूण ४५,५१४ मतदारांपैकी ३१,९९० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १५,८५९ पुरुष, १६,१२९ महिला व २ इतर मतदारांचा समावेश असून एकूण ७०.२९ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांनी दिली. या निवडणुकीत २७ नगरसेवकांसह नगराध्यक्षपदाचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, फलटणचा पुढील नगराध्यक्ष कोण होणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

    फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत सकाळपासूनच मतदारांनी विविध मतदान केंद्रांवर रांगा लावून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. बहुतांश ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मात्र किरकोळ वादाचे प्रकार काही ठिकाणी समोर आले. दरम्यान, प्रभाग क्रमांक १३ मध्ये मतदान यंत्रावरील बटन दाबले जात नसल्याची तक्रार समोर आली. याबाबत तीन ते चार उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, मशीन बदलण्यास विलंब झाल्याने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. नंतर प्रशासनाच्या हस्तक्षेपाने परिस्थिती नियंत्रणात आली.

    एकूणच, काही अपवाद वगळता फलटण नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून आता मतमोजणीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    ही मतमोजणी 13 टेबलावर 5 फेऱ्या होणार आहे दरम्यान ही मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणाला तारक तर कोणाला मारक ठरणार, हे उद्या रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारपर्यंत स्पष्ट होईल.

    फलटण नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर तसेच शिवसेनेचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात तुल्यबळ लढत पाहायला मिळाली, यामुळे कोण कोणाला चितपट करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. फलटण शहरातील सर्वच मतदान केंद्रावर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, यामध्ये प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक चार या ठिकाणी काही उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये किरकोळ बाचाबाची झाली, त्याचबरोबर एका महिला मतदाराला पोलिसांनी लाठी हल्ला केल्याची चर्चा होती, फलटण शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

    फलटण नगरपालिकेमध्ये थेट नगराध्यक्ष पद व 27 नगरसेवक यांचे राजकीय भवितव्य आज मतदान यंत्रामध्ये बंद झाले असून उद्या सकाळी दहा वाजता निकालाला सुरुवात होईल 13 टेबल वरती ही मतमोजणी होणार असून या मतमोजणीची संपूर्ण तयारी करण्यात आली असून उद्या रविवार दिनांक 21 रोजी निकालानंतर तब्बल नऊ वर्षानंतर फलटण पालिकेला नगराध्यक्ष तसेच नगरसेवक मिळणार असून भाजपा व शिवसेनेमध्ये झालेली तगडी लढत संपूर्ण सातारा जिल्ह्यात गाजली असून भाजपा की शिवसेना सत्तेत बसणार याची उत्कंठा फलटणमध्ये शिगेला पोहोचले आहे.

    दरम्यान फलटण कोरेगाव चे विद्यमान आमदार सचिन पाटील तसेच भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर अन् नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर या तिघांनी प्रभाग क्रमांक 13 मध्ये आपले मतदानाचा हक्क बजावला त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दोन तीन आणि चार या ठिकाणी साडेपाच वाजून गेल्यानंतरही मतदार मोठ्या संख्येने आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भल्या मोठ्या रांगेमध्ये उभे होते.

No comments