झोपडपट्टीवासीयांना धमक्या देणाऱ्या विरोधकांना त्यांची जागा दाखव - रणजितसिंह
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ - लक्ष्मीनगर सह फलटण शहराचा सर्वांगीण विकास करण्यात स्वर्गीय नंदकुमार आबाजी भोईटे खूप मोठा वाटा होता, याच विकासाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे पुतणे अमित भोईटे आणि रेहाना मोमीन या दोघांच्या माध्यमातून फलटण शहराचा उच्चभ्रू मतदार आणि झोपडपट्टी मतदार असा दुहेरी अंशाने बनलेल्या प्रभाग क्रमांक 10 चा विकास तर नक्कीच होईल, त्याचबरोबर प्रत्येक निवडणुकीमध्ये झोपडपट्टी वासीयांना धमक्या देऊन, ही जागा आमच्या मालकीची आहे आम्हालाच मते द्या असे म्हणणाऱ्या विरोधकांना सर्वसामान्य जनतेबाबत काहीही देणे घेणे नाही, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांना हेच झोपडपट्टीवासीय त्यांची जागा दाखवतील असा घणाघात माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केला.
फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चा प्रभाग क्रमांक दहाचा प्रचार शुभारंभ माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते जलमंदिर लक्ष्मीनगर फलटण येथे पार पडला, यावेळी फलटण कोरेगावचे विद्यमान आमदार सचिन पाटील, उमेदवार अमितशेठ भोईटे, दुसरे उमेदवार रेहाना मोमीन त्याचबरोबर प्रभारी लक्ष्मण सोनवलकर पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विरोधकांच्या गेल्या 35 वर्षाच्या राजकीय राजवटीचा पर्दाफाश करीत चौफेर टीका केली, गेली 35 वर्ष फक्त आणि फक्त सर्वसामान्य जनतेला झुलवत ठेवून, विकासापासून वंचित ठेवला आहे, यामुळे नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर प्रभाग क्रमांक 10 चे अमित भोईटे, रेहाना मोमीन यांच्यासह सर्व प्रभागात भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना सर्वसामान्य जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे रणजितसिंह यांनी सांगितले.
प्रभाग 10 मध्ये सर्वसामान्य जनतेला निवारा देण्यासाठी भोईटे कुटुंबीयांनी सर्वस्व पणाला लावीत, त्यांना घरे बांधून दिली, त्याचबरोबर कोरोना सारख्या महामारी मध्ये किराणा साहित्य असेल भाजीपाला असेल किंवा इतर काही मदत देत सामाजिक बांधिलकी जोपासली होती याची उतराई म्हणून प्रभाग क्रमांक दहा मधील जनता अमित भोईटे आणि रेहाना मोमीन यांना नक्कीच निवडून देतील असा ठाम विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर आचारसंहिता होताच झोपडपट्टी येथी राहिवाश्यांचा प्रश्न मार्गी लावून त्यांच्या नावासह त्यांना पक्की घरे मिळतील असा ठाम विश्वास आमदार सचिन पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी युवा नेते ऋतुराज भोईटे, बबलू शेठ मोमीन, प्रभाग 11 चे उमेदवार संदीप चोरमले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील अमितशेठ भोईटे व बबलू यांनी प्रभाग क्रमांक दहा मध्ये घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या यावेळी प्रत्येक घरामध्ये त्यांचे उत्साहात स्वागत केले.

No comments