Breaking News

खासदार गटाकडून फेक नरेटिव्ह - फलटणला पाणी टंचाई! साफ खोटं! - कृष्णाथ चोरमले

Fake narrative from MP group - Phaltan has water shortage! Absolutely false! - Krishnath Chormale

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ - खासदार गटाकडून पाणीटंचाईची फेक नरेटिव्ह पसरवले जात असून, फलटणला पाणीटंचाई अजिबात नाही, उन्हाळ्यात राज्यातील इतर शहरांमध्ये पाणीटंचाई भासत असून तिथे टँकर सुरू करावे लागतात मात्र आमचे नेते विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दूरदृष्टीतून पुढील 25 वर्ष लोकसंख्या हिशोबात पकडून, स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा होईल याची व्यवस्था केलीआहे, आणि त्यामुळेच फलटण शहराला कधीही पाणीटंचाई भासली नाही, परंतु विरोधकांकडून पाण्याचा मुद्दा पुढे करीत केवळ आणि केवळ  फेक नरेटिव्ह पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याची खरमरीत टीका प्रभाग क्रमांक 11 चे उमेदवार दादासाहेब उर्फ कृष्णाथ मल्हारी चोरमले यांनी केली.

    फलटण शहराचा सर्वांगीण विकास करीत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः दादासाहेब चोरमले व प्रियांका युवराज निकम निवडणूक लढवीत असून, राजे गटाने केलेल्या विकास कामांवर लोक खुश आहेत, त्यामुळे आमच्या प्रत्येक मतदारांकडे जात असताना अनेकांनी आमचे तोंड भरून कौतुक केले अशी माहिती दादासाहेब चोरमले यांनी दिली.

    फलटण शहरातील प्रत्येक गल्लीबोळातील रस्ता करण्यासाठी तब्बल 14 कोटी रुपये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपलब्ध करून दिले होते, त्यातून फलटण शहरातील अनेक रस्ते चांगले झाले मात्र गेल्या चार वर्षांमध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची दयनीय अवस्था नक्कीच झाली आहे, मात्र हे प्रशासक कोणाच्या अधिपत्याखाली काम करतात याची फलटणकरांना जाण आहे, त्यामुळे आरोप करीत असताना आरोपात कुठेतरी तथ्यता असावी केवळ आणि केवळ मतदारांनी विरोधकांना नाकारल्यामुळे आमच्या बाबत फेक नरेटिव्ह पसरवून केवळ आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू असून या प्रयत्नाला फलटणकर नागरिक नक्कीच मताच्या रूपाने श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर मला आणि प्रियांका युवराज निकम यांना भरघोस मतांनी निवडून देतील असा विश्वास दादासाहेब चोरमले यांनी व्यक्त केला.

    नुकताच विरोधकांनी फलटण शहरातील पाच टाक्या बांधून आहेत, मात्र लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही असा धडधडीत खोटा आरोप केला होता, या आरोपांना उत्तर देताना दादासाहेब चोरमले यांनी विरोधकांना थेट आव्हान देत कोणती टाकी बांधून उभी आहे ती दाखवा असे प्रति आव्हान देत विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढले, यावेळी दादासाहेब चोरमले यांनी सांगितले की, शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचबरोबर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना तसेच कृष्णा भीमा विकास आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या संख्येने त्याचबरोबर मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त करीत विरोधकांचे सर्व आरोप धुडकावून लावले.

    यावेळी युवराज निकम, निखिल डोंबे, अमर पिसाळ, माजी नगरसेविका वैशालीताई चोरमले यांच्यासह शिवसेना गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments