Breaking News

अमृता अहिवळे चे एमपीएससी मध्ये उत्तुंग यश ; रामराजेंनी केला अमृताचा विशेष सत्कार

Amrita Ahiwale's great success in MPSC; Ramraje felicitated Amrita

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० -: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत फलटण तालुक्यातील मंगळवार पेठेतील कु. अमृता (गौरी) बाळासाहेब अहिवळे हिने ऐतिहासिक यश मिळवले आहे. अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून तिने उद्योग निरीक्षक (Industry Inspector) आणि तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) या पदांवर निवड मिळवली आहे. फलटण तालुक्याचे नाव राज्यभरात उजळवणारे हे अभिमानास्पद यश आहे.

या उल्लेखनीय कामगिरीनंतर महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर, आणि श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी मंगळवार पेठेत येऊन कु. अमृता हिचा विशेष सत्कार केला. यावेळी आमदार संजीवराजे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

“शिक्षणाशिवाय प्रगती शक्य नाही. कोणालाही शिक्षणात किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात अडचण आली तर आम्ही सदैव सोबत आहोत, हे लक्षात ठेवा,” असे ते म्हणाले.

कु. अमृता ही अभ्यासू, शिस्तप्रिय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणारी विद्यार्थीनी म्हणून ओळखली जाते. कष्ट, चिकाटी आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर तिने हे यश संपादन केले असून तिच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तिच्या या यशाबद्दल समस्त अहिवळे परिवार, नातेवाईक, मित्रपरिवार आणि तालुक्यातील नागरिकांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. फलटणच्या युवा पिढीसाठी कु. अमृता अहिवळे हिची ही यशोगाथा प्रेरणादायी ठरत आहे.

No comments