मतदार यादीवर हरकत दाखल करताना अर्जासोबत रहिवासी पुरावा जोडावा - मुख्याधिकारी निखिल जाधव
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ११ - फलटण नगरपरिषदेच्या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकत दाखल करताना, नागरिकांनी आपल्या अर्जासोबत स्थळ पाहणीसाठी सक्षम रहिवासी पुरावा जोडणे महत्वाचे आहे, असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यावर हरकती व सूचना दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दाखल झालेल्या हरकतींवर नगरपालिका प्रशासनामार्फत जागेवर जाऊन स्थळ पाहणी केली जाणार आहे. या पाहणीसाठी रहिवासी पुरावा आवश्यक असल्याने, नागरिकांनी हरकतीसोबत रहिवासी पुरावा जोडावा. पुराव्यासह आलेल्या हरकतींवरच नगरपालिका प्रशासनाकडून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी जाधव यांनी स्पष्ट केले.
मतदार यादीवर हरकत दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार, दि. १३ ऑक्टोबर आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
No comments