Breaking News

जिल्हा परिषद - पंचायत समिती आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

ZP - Panchayat Samiti reservation draw schedule announced

    सातारा  (प्रतिनिधी)जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ तसेच जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम नियम, २०२५ नुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील विविध प्रवर्गांसाठीच्या जागांची आरक्षण सोडत घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये १३ ऑक्टोबर  रोजी सकाळी ११.३० वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

    ही सोडत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग तसेच त्यामधील स्त्रिया आणि सर्वसाधारण स्त्रिया अशा प्रवर्गांसाठी राखीव जागा निश्चित करण्यासाठी घेतली जाणार आहे. या सोडतीद्वारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आरक्षणाचे चक्र निश्चित होणार आहे.

    जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले की, संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील रहिवाशांना या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या सोडतीमुळे प्रत्येक तालुक्यातील आरक्षण संरचना निश्चित होणार असून, नागरिकांचा सहभाग पारदर्शकतेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

 जिल्ह्यातील सभा आणि ठिकाणे पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहेत:

 जिल्हा परिषद, सातारा — नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा
 खंडाळा पंचायत समिती — तहसिल कार्यालय, खंडाळा
 फलटण पंचायत समिती — सजाई गार्डन मंगल कार्यालय, जाधववाडी (फलटण)
 माण पंचायत समिती — तहसिल कार्यालय सभागृह, दहिवडी
 खटाव पंचायत समिती — पंचायत समिती सभागृह, खटाव
 कोरेगाव पंचायत समिती — तहसिल कार्यालय, कोरेगाव
 वाई पंचायत समिती — देशभक्त किसनवीर सभागृह, पंचायत समिती, वाई
महाबळेश्वर पंचायत समिती — मध संचालनालय, महाबळेश्वर
 जावली पंचायत समिती — पंचायत समिती सभागृह, मेढा
 सातारा पंचायत समिती — स्व. आ. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सभागृह, पंचायत समिती, सातारा
 पाटण पंचायत समिती — लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी संकूल, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कराड,चिपळून रोड, काळोली
 कराड पंचायत समिती — स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह (टाऊन हॉल), कराड

No comments