धुमाळवाडी येथील दरोड्यासह मोक्क्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस जेरबंद
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ - दि. ८/७/२०२५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास धुमाळवाडी, ता. फलटण येथील धबधबा पाहुन पर्यटक आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले असताना वारुगडच्या टेकडीवरुन टेहाळणी करणाऱ्या एकुण १० इसमांनी महिला पर्यटकांना हेरुन धबधब्यापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर गाठुन लाकडी दांडकी व लोखंडी सुऱ्याचा धाक दाखवुन लुटमार केली आहे. यामध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने व पुरुषाकडील मनगटी घड्याळ व पैसे असा एकुण ५४५००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरुन नेल्याची घटना घडली आहे. त्याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, गु. र. नं. 510/2025, भा. न्या. सं. 2023 चे कलम 310 (2) नुसार गुन्हा नोंद असुन त्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी सोमेश्वर जायपत्रे हे करीत आहेत.
प्रस्तुत गुन्ह्यातील आरोपी रणजित कैलास भंडलकर व तानाजी नाथाबा लोखंडे दोघे रा. खामगाव, ता. फलटण, जि. सातारा हे गुन्हा दाखल झालेपासुन फरार होते. त्यांच्यापैकी आरोपी रणजित कैलास भंडलकर याचेवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, गर्दी मारामारी, खंडणी, दुखापत व महिला अत्याचारासारखे एकुण 08 गुन्हे दाखल आहेत. तो पोलीसांना गुंगारा देण्यात पटाईत आहे. फलटण तालुक्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला खंडणी मागितल्याच्या प्रकरणात मोक्क्याच्या गुन्ह्यात तो मागील 04 वर्षापासून फरार होता.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मा. तुषार दोषी सर व अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. वैशाली कडुकर मॅडम यांनी पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेऊन प्रभावीपणे कार्यवाही करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार नुतन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल खांबे यांचे नेतृत्वाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे नुतन प्रभारी अधिकारी शिवाजी जायपत्रे यांनी विशेष मोहिम आखुन मागील 05 वर्षापासून खुनाचा प्रयत्न, दरोडा व मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यातील फरारी आरोपी रणजित कैलास भंडलकर याचा माग काढण्यास सुरुवात केली होती. दि. 05/10/2025 रोजी रात्री 10.00 वा. चे सुमारास तो व त्याचा साथीदार तानाजी नाथाबा लोखंडे हे सांगवी, ता. फलटण, जि. सातारा येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर स. पो. नि. शिवाजी जायपत्रे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पो. उ. नि. बदने, पोलीस अमंलदार वैभव सुर्यवंशी, नितीन चतुरे, श्रीनाथ कदम, अमोल जगदाळे, हणमंत दडस, कल्पेश काशिद, तानाजी ढोले, गणेश ठोंबरे व अक्षय खाडे यांनी त्याठिकाणी सापळा लावुन दोघांनाही शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली आहे.
No comments