Breaking News

आपली फलटण मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद ; २२०० जणांचा सहभाग

Spontaneous response to our Phaltan Marathon; 2200 people participated

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १०- जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण आणि रोबोटिक्स सेंटर, फलटण यांच्या माध्यमातून प्रतिवर्षीप्रमाणे  यावर्षीही आपली फलटण मॅरेथॉनचे आयोजन रविवार दि. १२ ऑक्टोबर रोजी करण्यात येत असून यावर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. सुमारे २२०० वर स्पर्धकांनी नाव नोंदणी केली असून त्यामध्ये वृद्धांची संख्या सुमारे ५०० हुन अधिक असल्याचे डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी सांगितले आहे.

    गेली ८ वर्षे प्रतिवर्षी आपली फलटण मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत असून प्रत्येकवर्षी लोकांचा उत्साह वाढतच असल्याचे निदर्शनास आणून देत लोकांना व्यायामाची सवय लागावी, सगळ्यांचे आरोग्य उत्तम रहावे या शुद्ध हेतूनेच आपण, ही मॅरेथॉन सुरु केली आहे. त्यामध्ये विविध वयोगटातील स्त्री - पुरुष, वृद्ध आणि तरुणांचा वाढता सहभाग समाधान देणारा असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी आवर्जून सांगितले.

    आपली फलटण मॅरेथॉनच्या माध्यमातून यावर्षी अवयव दान आणि वृक्षारोपण व संवर्धन या मोहिमेची सुरुवात करण्यात आली असून अवयव दानासंबंधी जनप्रबोधन आणि वृक्षारोपण व संवर्धन मोहिमेला बळ देण्यासाठी आपली फलटण मॅरेथॉन मधील यशस्वीतांपैकी १ हजार जणांना देशी वृक्षांची रोपे देऊन त्याचे सलग ३ वर्ष संवर्धन केल्यानंतर तेथून पुढे आपली फलटण मॅरेथॉनमध्ये त्यांचा विशेष सहभाग नोंदवून प्रवेश फी न घेता त्यांना मॅरेथॉन मध्ये सहभागी करुन घेण्यात येणार असल्याचे डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

    आपली फलटण मॅरेथॉनचे बक्षीस वितरण आणि उपस्थितांना मार्गदर्शन असा दुहेरी उद्देश ठेवून प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आतापर्यंत निमंत्रित करण्यात आले असल्याचे निदर्शनास आणून देत यावर्षी महाराष्ट्रातील पहिल्या व कर्तृत्ववान महिला पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. उपस्थित श्रोते, मॅरेथॉनमध्ये सहभागी विविध वयोगटातील तरुण वर्गासह नागरिक स्त्री - पुरुष यांना मार्गदर्शन आणि विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यासाठी मीरा बोरवणकर यांना निमंत्रित करण्यात आल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी सांगितले.

    रविवार दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता सजाई गार्डन कार्यालय, विमानतळ, फलटण येथून सुरु होणाऱ्या आपली फलटण मॅरेथॉन २०२४ - २५ चा शुभारंभ मीरा बोरवणकर व अन्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

    आपली फलटण मॅरेथॉन मध्ये एकूण ३ विभागातील सहभागी स्पर्धकांपैकी पुरुष व महिला असे प्रत्येकी पहिले ३ क्रमांकांना  मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे दिली जाणार आहेत. एकूण १८ बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यामध्ये पहिले बक्षीस १० हजार रुपये, दुसरे बक्षीस ७ हजार रुपये, तिसरे बक्षीस ५ हजार रुपये असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी सांगितले.

    मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्यांना आकर्षक फिनिशर मेडल तसेच मॅरेथॉन मध्ये सहभागी रनर्सना प्रत्येकी एक मॅरेथॉन किट दिले जाणार आहे, ज्या मध्ये टाईम चीप बिब, टी शर्ट, एनर्जी बार, टोपी आणि एक उत्तम भेट वस्तू असणार आहे.

    स्पर्धेतील सहभागासाठी नाव नोंदणी केलेल्या सर्वांनी दि. ९, १० व ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मॅरेथॉनचे किट जोशी हॉस्पिटल, फलटण चौथा मजला येथून घेऊन जावेत असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या दिवशी कोणालाही मॅरेथॉन किट मिळणार नाही याची नोंद घेऊन सर्वांनी अगोदर किट घ्यावेत, अशी विनंती संयोजकांनी केली आहे.

    यावर्षी जोश पूर्ण या १८ ते ३० वयोगटात २००, सळसळती तरुणाई या ३१ ते ४५ वयोगटात ४००, प्रगल्भ प्रौढ या ४६ ते ६४ वयोगटात ५०० आणि अनुभवी ज्येष्ठ या ६५ वर्षांवरील वयोगटात ४०० वृध्द स्त्री - पुरुषांनी नाव नोंदणी केली असल्याचे डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी सांगितले.

    ४६ ते ६४ वयोगटातील स्पर्धकांसाठी ५ कि. मी., ३१ ते ४५ वयोगटातील स्पर्धाकांसाठी १० कि. मी., १८ ते ३० वयोगटातील स्पर्धकांसाठी १५ कि. मी. आणि ६५ वर्षांवरील स्पर्धकांसाठी केवळ ३ कि. मी. अंतराची मॅरेथॉन आयोजित करण्यात येत आहे.

    रोबोटीक्स यंत्रणेद्वारे गुडघ्यांची शस्त्रक्रिया झालेल्या ९०० जणांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून त्यांचेसाठी केवळ एक कि. मी. अंतरातील  वाकेथॉनचे आयोजन करण्यात येणार असल्याचे डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

No comments