Breaking News

शरयु साखर कारखाना बॉयलर पूजन व अग्नी प्रदीपन विधिवत संपन्न

Sharyu Sugar Factory Boiler Poojan and Fire Lighting Ceremony Completed

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ -  शरयु साखर कारखान्याच्या सन २०२५ - २६ या चालू गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली असून करार केलेली तोडणी वाहतूक यंत्रणा कार्यक्षेत्रात दाखल झाली आहे.मंत्री समितीच्या बैठकित ठरल्यानुसार यंदाचा गळीत हंगाम एक नोव्हेंबर पासून चालू होणार आहे.

     कापशी, ता. फलटण येथील शरयु साखर कारखान्याच्या ११ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदिपन कारखान्याचे कार्यकारी संचालक मा श्री युगेंद्रदादा पवार यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. प्रारंभी संचालक अविनाश भापकर व सौ. कमलताई भापकर यांनी होम हवन व नवग्रह पूजा केली.

     शरयुने यावर्षी तालुक्यात उच्चतम ऊस दराची परंपरा कायम राखली असून ३१०० रुपये प्रति टन दर देऊन एकरकमी विनाकपात ऊस बिल वेळेत ऊस पुरवठादार शेकऱ्यांना अदा केले आहे. यंदा पाऊस चांगला झाला असून ऊस क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे  फलटण, कोरेगाव, सातारा, वाई, खंडाळा, माळशिरस, भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यातील कृषी उत्पादक शेतकऱ्यांनी  आपला संपूर्ण ऊस गाळपासाठी शरयुला द्यावा असे आवाहन केले असून यावर्षी १० लाखाहून अधिक गाळपाचे उद्दीष्ट असल्याचे युगेंद्रदादा पवार यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

 व्हीएसआयच्या  (एआय) तंत्रज्ञान योजनेत शरयु कारखान्याचा समावेश झाला असून या योजनेसाठी कार्यक्षेत्रातील सुमारे दोनशे शेतकऱ्यांनी नोंदी केल्या आहेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  एआय तंत्रज्ञानाचा अंगीकार करून आपले उत्पन्न वाढविण्याचे आवाहन श्री युगेंद्रदादा पवार यांनी केले आहे. परिसरातील शेतकऱ्यांसाठी  उच्चतम दर्जाची ऊस रोपवाटिका कार्यान्वित होणार असून  दर्जेदार जैविक खते लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

    दरम्यान आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला प्रती टन एक किलो याप्रमाणे शरयु साखर कारखाना कार्यस्थळ व विविध ठिकाणच्या गट कार्यालयात सवलतीच्या दरात साखर वाटप दिवाळी पूर्वीच पूर्ण झाले असून  शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे.

No comments