किरकोळ कारणावरून खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेपेसह दंडाची शिक्षा
सातारा दि 8 (प्रतिनिधी) किरकोळ कारणावरून एकाचा चाकूने भोकसून खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेप व दंडाची शिक्षा कराड न्यायालयाचे पहिले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशयु. एल. जोशी यांनी सुनावली आहे. याचबरोबर खोटी साक्ष दिल्याप्रकरणी एका महिला डॉक्टरलाही नोटीस बजावण्यात आली आहे.
रोहिदास बाळकृष्ण सावंत राहणार चिंचणी तालुका कराड असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 24 जुलै 2017 रोजी चिंचणी, तालुका कराड येथील वरदायिनी देवीच्या मंदिरात गावकऱ्यांनी भंडारा आयोजित केला होता. या भंडाऱ्यात भात-आमटीचे नियोजन करण्यात आले होते. त्यावेळी आरोपी रोहिदास सावंत याने दारूच्या नशेत त्या ठिकाणी येऊन भातात आमटी का वाढत नाही, असे म्हणून भांड्यातील आमटी ओतली. त्यावेळी तेथीलच महेश पवार यांनी त्यास अटकाव केला असता त्याच्याशी रोहिदास सावंत याने बाचाबाची केली. यानंतर गावकऱ्यांनी मध्यस्थी करून सावंत याला घरी पाठवले. मात्र तासाभरानंतर रोहिदास सावंत हा चाकू घेऊन त्या ठिकाणी आला आणि महेश पवार यास शिवीगाळ करू लागला त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या तेथीलच अमोल अशोक पवार वय ३४ वर्षे हा रोहिदास सावंतला समजावून सांगत असताना सावंत याने तुला आणि तुझ्या भावाला जिवंत ठेवत नाही असे म्हणून अमोल पवार याच्यावर चाकूने तीन वार केले. त्यावेळी महेश पवार हा मध्ये आला असता तोही चाकूच्या वाराने जखमी झाला. यानंतर गंभीर जखमी झालेल्या अमोल पवार याला कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र दिनांक 27 जुलै 2018 रोजी अमोल पवारचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
या घटनेचा प्राथमिक तपास उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एस. कापसे यांनी करून उर्वरित संपूर्ण तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.ए. भोसले यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
त्या खटल्याचे कामकाज कराड न्यायालयाचे पहिले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांच्यासमोर चालले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुष्पा जितेंद्र जाधव यांनी काम पाहिले त्यांनी या खटल्यात 21 साक्षीदार तपासले आणि जोरदार युक्तिवाद केला. त्याचवेळी काही खटल्यांचे प्रमाण देखील न्यायालयासमोर मांडले. न्या. जोशी यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पंच तपासी अंमलदार आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी ग्राह्य मानून आरोपी रोहिदास बाळकृष्ण सावंत खून प्रकरणी जन्मठेप व दहा हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात न्यायालयाने मयताच्या नातेवाईकांनाही नुकसान भरपाईची तजवीज ठेवली आहे.
खटल्याच्या कामकाजात सरकार पक्षास उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल पी. एच. कार्वेकर आणि पी. ए. पाटील यांनी सहकार्य केले.
खोटी साक्ष दिल्या प्रकरणी डॉक्टरला नोटीस
या खटल्यात खोटी व चुकीची साक्ष दिल्या प्रकरणी कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टर अश्विनी पद्माकर महामुनी यांना कोर्टाने नोटीस बजावली आहे. या नोटीसीमुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
No comments