श्रीमंत संजीवराजे यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्तांना मदत ; मुधोजी महाविद्यालयाचा उपक्रम
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)- नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसामुळे विदर्भ मराठवाडा व सोलापूर मध्ये महापूराची स्थिती निर्माण झालेली होती. अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाले, घरे पडली,शेतीचे नुकसान झाले, जनावरे मरण पावली अशा स्थितीत सामाजिक संवेदनशीलता म्हणून, प्रत्येकाने मदत करणे, नैतिक कर्तव्य बनते, याची जाणीव विद्यार्थ्यांच्या मध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने मुधोजी महाविद्यालयांमध्ये दिनांक 7 व 8 ऑक्टोबर 2025 रोजी पूरग्रस्तांसाठी वस्तू स्वरूपातील मदतीचे संकलन करण्यात आले, त्याला विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी संवेदनशील प्रतिसाद दिला व जीवनावश्यक किराणा वस्तू, भांडी साड्या व ड्रेस, अशा स्वरूपाची मदत सर्वांनी केली. फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा 9 ऑक्टोबर हा वाढदिवस असतो, तो त्यांनी स्वतःहून साजरा न करण्याचे नागरिकांना आवाहन केले होते, त्याऐवजी आपण सर्वांनी मिळून पूरग्रस्तांना मदत करूया असे त्यांनी जाहीर केलेले होते. त्या जाहीर आवाहनाला प्रतिसाद देत, मुधोजी महाविद्यालयाने हा स्तुत्य उपक्रम राबविला.
यामध्ये विविध जीवनावश्यक वस्तू (50 किलो गहू, 50 किलो तांदूळ, 29 किलो साखर, 29 किलो रवा, 21 किलो ज्वारी व इतर जीवनावश्यक वस्तू) , कपडे (43 साड्या व 20 ड्रेस), भांडी (3 पोती भांडी) अशा प्रकारची मदत सर्वांनी देऊ केली. ही मदत श्रीमंत संजीवराजे यांच्या शुभहस्ते हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम मुधोजी महाविद्यालयात पार पडला, याप्रसंगी फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. फिरोज शेख प्रा. प्रशांत शेटे डॉ. वैशाली कांबळे यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबवला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच समाजाप्रती दायित्वाची जाणीव झाल्याचे दिसून आले. भारतीय संस्कृतीमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये नेहमीच लोक आपत्तीग्रस्तांना मदत करत असतात हे आपण पाहिलेले आहे. त्याचाच प्रत्यय आम्हाला आल्याचे प्रतिपादन प्रचार्य डॉ. पी.एच कदम यांनी केले.
याप्रसंगी श्रीमंत संजीवराजे यांनी मनोगत व्यक्त करताना, आपण आपत्तीग्रस्तांना मदत करणे ही सर्वांची जबाबदारी असून मुधोजी महाविद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही जी मदत करण्याची भूमिका घेतली ती अतिशय कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.
No comments