प्रभाग आरक्षणाने दिला प्रस्थापितांना धक्का ; काही जणांना लॉटरी तर काही जणांवर पर्याय शोधण्याची वेळ
सातारा दिनांक 8 (प्रतिनिधी ) - सातारा पालिकेची 25 प्रभागांची आरक्षण प्रक्रिया बुधवारी शाहू कला मंदिर मध्ये पार पडली .या आरक्षण सोडत प्रक्रियेने प्रस्थापित चेहऱ्यांना धक्का दिला तर काही जणांना खुल्या प्रवर्गामुळे लॉटरी लागली असून त्यांची राजकीय वाटचाल सुकर झाली आहे .त्यामुळे सातारा शहरांमध्ये कही खुशी कभी गम असे वातावरण आहे .
सातारा पालिका निवडणुकांच्या रणधुमाळीला आता वेग आला आहे . प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधी चा नगराध्यक्ष व प्रभाग आरक्षणाच्या प्रक्रियेनंतर प्रारूप मतदार यादी व राजपत्रांमध्ये त्याची प्रसिद्धी हे टप्पे बाकी आहेत .बुधवारी जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षणाने सातारा शहराची राजकीय समीकरणे बिघडवली आहेत . प्रभाग क्रमांक 17 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला हे आरक्षण पडले आहे त्यामुळे येथील चर्चेतील सातारा विकास आघाडीचे तडफदार नेतृत्व संग्राम बर्गे यांची अडचण झाली आहे .प्रभाग क्रमांक 11 मध्ये सर्वसाधारण आरक्षण पडल्याने अविनाश कदम यांचा मार्ग सुकर झाला आहे तर सातारा विकास आघाडीचे वसंत लेवे राहतात त्या प्रभाग क्रमांक 23 मध्ये तेथे इतर मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे .अण्णा लेवे यांना 23 मधून आपली पत्नी मुक्ता लेवे यांचा पर्याय दिला जाऊ शकतो तर व्यंकटपुरा पेठ चा पारंपारिक मतदारसंघ असल्याने तेथेही लेवे यांचे मतदान आहे त्यामुळे 11 क्रमांकाच्या प्रभागातून ते स्पर्धेमध्ये येऊ शकतात .प्रभाग क्रमांक 13 मध्ये बाळासाहेब खंदारे यांची अनुसूचित जाती महिला या आरक्षणामुळे अडचण जरी झाली असली तरी त्यांना सर्वसाधारण गटाचा पर्याय आजमावा लागेल .प्रभाग क्रमांक 18 मध्ये ओबीसी महिला आरक्षणामुळे सातारा विकास आघाडीचे माजी पक्षप्रतोद ऍडव्होकेट दत्ता बनकर यांची सुद्धा अडचण झाली आहे त्यामुळे त्यांनाही खुल्या प्रवर्गातूनच आपले नशीब आजमवावे लागेल मात्र तेथील मराठा मताची बेगमी करणे आणि सातारा विकास आघाडी तेथे फ्रंट फुटवर आणणे हे महत्त्वाचे राहणार आहे.
प्रभाग क्रमांक सात हा मनोज शेंडे यांच्यासाठी खुल्या प्रवर्गामुळे लॉटरी ठरणार आहे .थेट नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणारे मनोज शेंडे त्यांच्या गेल्या पाच वर्षातील संघटनात्मक बांधणीमुळे येथे डोळे झाकून निवडून येणार असे मतदार छाती ठोकपणे सांगत आहेत .प्रभाग क्रमांक चार मध्ये अनुसूचित जाती महिलेचे आरक्षण पडल्यामुळे निशांत पाटील यांची सुद्धा तशी अडचण झाली आहे त्यामुळे त्यांना ब गटातून पडलेल्या सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून यावे लागेल .प्रभाग क्रमांक 12 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण पडल्याने उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक संजय शिंदे आणि किशोर तात्या शिंदे यांची सुद्धा अडचण झाली आहे येथे सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या आरक्षणातून त्यांना घरच्याच महिला उमेदवारांचा चेहरा द्यावा लागेल .प्रभाग 20 व 21 या दोन्ही प्रभागांना आरक्षण प्रक्रियेने वाचवले आहे प्रभाग वीस मध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे त्यामुळे अमोल मोहिते यांचा मार्ग सुकर झाला आहे तर प्रभाग 21 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला अशा आरक्षणामुळे अशोक मोने ही पुन्हा रिंगणात असू शकतात .भाजपच्या पक्षप्रतोद सिद्धी पवार या मूळच्या वार्ड क्रमांक 22 च्या मात्र तेथील प्रभाग रचनेमध्ये रामाचा गोट परिसर प्रभाग क्रमांक 24 11 12 आणि 22 या चार ठिकाणी विभागाला गेला आहे त्यामुळे सिद्धी पवार यांना सुद्धा पर्याय निर्माण झाले आहेत पारंपरिक 22 प्रभागासह त्या पुन्हा रिंगणात येऊ शकतात.
नगराध्यक्ष पद यंदा खुल्या प्रवर्गात आल्यामुळे अनेकांच्या आकांक्षा पल्लवीत झाल्या आहेत बहुतांश नगरसेवकांनी विशेषता ज्यांच्या चार टर्म नगरपालिकेत झाल्या आहेत अशांनी थेट नगराध्यक्ष पदासाठी दावा केल्याने दोन्ही नेत्यांपुढील प्रत्यक्ष नगराध्यक्ष निवडीचा पेच अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे .दोन्ही नेत्यांना अत्यंत राजकीय मुत्सद्दीपणाने याबाबतचा निर्णय घ्यावा लागणार आहे . .बुधवारी झालेल्या प्रभाग आरक्षण सोडतीत काही ठिकाणी आनंद तर काही ठिकाणी राजकीय महत्त्वाकांक्षांना मुरड घालण्याची आलेली विमनस्क वेळ असे दुहेरी चित्र पाहायला मिळाले.
No comments