Breaking News

फलटणमध्ये जयंती उत्सव व रस्ते कामांचा समतोल राखण्यासाठी संयुक्त बैठक

Joint meeting to maintain balance between Jayanti celebrations and road works in Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.४ मार्च २०२६ - फलटण शहरात आगामी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव व भगवान महावीर जन्मकल्याणक जयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते कामे व नागरिकांच्या गैरसोयी यांचा समतोल राखण्यासाठी आज (दि. ०४ मार्च २०२६) महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली.

    ही बैठक फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री. समशेरदादा नाईक निंबाळकर व उपनगराध्यक्ष सौ. प्रियदर्शनी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. बैठकीस परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटी, श्री 1008 भगवान महावीर जन्मकल्याणक जयंती महोत्सव कमिटी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    बैठकीदरम्यान शहरातील सुरू असलेली रस्ते कामे, पालखी मार्गावरील प्रकल्प, तसेच जयंती काळात मिरवणुका व कार्यक्रमांमुळे निर्माण होणारे संभाव्य अडथळे यावर सविस्तर चर्चा झाली. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, वाहतूक सुरळीत राहील आणि उत्सव शांततेत पार पडतील यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर एकमत झाले.

    यावेळी  पीडब्लूडीचे डेप्युटी इंजिनिअर आंबेकर साहेब, ज्युनिअर इंजिनिअर साबळे साहेब, पालखी मार्ग प्रकल्प व्यवस्थापक प्रफुल्ल पाटील, नगरपरिषदेच्या मागासवर्गीय दुर्बल घटक कल्याणकारी समितीच्या सभापती तथा नगरसेविका सौ. सुपर्णा अहिवळे, नगरसेविका मीना काकडे, मा. अमोल सस्ते, आंबेडकर जयंती महोत्सव कमिटीचे अध्यक्ष हरीशआप्पा काकडे, महावीर जयंती महोत्सव कमिटीचे अध्यक्ष सागर दोशी तसेच व्यापारी प्रतिनिधी राजुशेठ वाकडमाने, निलेशशेठ दोशी, पंकजशेठ दोशी (डी.जी. कंपनी) आदी मान्यवर उपस्थित होते.

    बैठकीतून समन्वयाने काम करून जयंती उत्सव यशस्वीपणे पार पाडण्याचा आणि शहरातील विकासकामेही नियोजित पद्धतीने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

No comments