भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सातारच्या क्रांतिकारकांचे योगदान महत्वाचे - विजय मांडके
सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ सप्टेंबर २०२५ - सातारा १८५७ च्या उठावापासून क्रांतिकारकांच्या असीम त्याग व बलिदानामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले, याच उठावात सातारच्या क्रांतिकारकाचे योगदान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके यांनी केले.
कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा व जिज्ञासा इतिहास संवर्धन व संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने फाशीचा वड येथे सातारा क्रांतिदिना निमित्त आयोजीत हुतात्म्यांना अभिवादन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड, जिज्ञासाचे कार्यवाह निलेश पंडीत हे प्रमुख उपस्थित होते.
विजय मांडके म्हणाले, १८५७ च्या उठावात सातारची भूमिका खूप महत्वाची राहिली आहे या बंडात सामील झालेल्या १७ क्रांतिकारकांना इंग्रजांनी राजद्रोहाच्या खटल्यात दोषी ठरविले यानुसार संबंधीतांना ८ सप्टेंबर १८५७ रोजी गेंडामाळ येथील फाशीचा वड येथे शिक्षा देण्यात आली. हा दिवस सातारा नव्हे तर देशाच्या इतिहासात क्रांतिकारी दिवस आहे. या उठावात सहभागी झाल्याबद्दल १७ क्रांतिकारकांची इंग्रजांनी मालमत्ता जप्त केली होती. या महान क्रांतिकारजकांच्या वारसदारांना या संदर्भात अजूनही न्याय मिळाला नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. सातारच्या उठावात समाजातील सर्व घटकातील क्रांतिकारकांचा सहभाग होता. या क्रांतिकारकांच्या असीम त्यागामुळे व बलिदानामुळे आपणाला स्वातंत्र्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी विद्यार्थी व प्राध्यापकांच्यावतीने हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. जिज्ञासाचे निलेश पंडीत यांनी या उठावातील घटनांची माहिती दिली. विद्यार्थी वर्गाने या क्रांतिलढ्याचा हा सातारचा क्रांतिकारी इतिहास म्हणून अभ्यास करावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रास्ताविक डॉ. राजेंद सातपुते व आभार प्रा. गौतम काटकर यांनी मानले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड, प्रा. राजेंद्र घाडगे, डॉ. सुवर्णा कांबळे, डॉ. विजय पवार, डॉ. रवींद्र चव्हाण, डॉ. भरत जाधव, डॉ. मनिषा जाधव, प्रा. डॉ. प्रकाश कांबळे, प्रा संदीप पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
No comments