Breaking News

महिला डॉक्टर केस - PSI गोपाळ बदने यांना दि.30 पर्यंत पोलीस कोठडी

Dr. Sampada Munde case - PSI Gopal Badne remanded in police custody till 30th

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ ऑक्टोबर २०२५ - फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने हा काल (शनिवारी) रात्री उशिरा फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. आज (रविवारी) त्याला फलटण येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने गोपाळ बदने यास दि.३० ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

    गोपाळ बदने यांचा शोध फलटण शहर व ग्रामीण पोलीसांकडून मोठ्या प्रमाणावर सुरू होता. पोलीस पथके पंढरपूर आणि पुणे येथे पाठवण्यात आली होती. मात्र, शनिवारपर्यंत तो पोलिसांना सापडला नव्हता. अखेर रात्री उशिरा तो फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाला.

    दरम्यान, या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी प्रशांत बनकर यास देखील न्यायालयाने दि. २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी मिळाल्याने, आत्महत्येच्या मागील कारणांचा तपास वेगाने होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महिला डॉक्टर यांच्या आत्महत्येमागे आणखी कोण सहभागी आहे का? याचा तपास आता निर्णायक टप्प्यात जाण्याची शक्यता आहे.

No comments