फलटणात क्रांतीसिंह नाना पाटील चौकात वाहतूक ठप्प - कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २३ ऑक्टोबर २०२५ - आज दुपारी फलटण शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली. काही तास वाहने अडकून राहिल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
या चौकात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असून, नागरिकांकडून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले यांनी या संदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधले असून, चौकात नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्था उभारण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोडसे यांनी सांगितले की, “क्रांतीसिंह नाना पाटील चौकात वारंवार वाहतूक ठप्प होते. येथे सिग्नल बसविणे अत्यंत आवश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
नागरिकांच्या दैनंदिन हालचाली सुलभ व्हाव्यात आणि शहरातील वाहतूक शिस्तीत रहावी यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

No comments