फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या ; रक्षक झाले भक्षक ; संबंधितांना तातडीने निलंबित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ ऑक्टोबर २०२५ - फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने फलटण येथीलच एका पोलीस निरीक्षकाने आपल्यावर चार वेळा अत्याचार केला तसेच पोलिस कॉन्स्टेबलने आपला मानसिक छळ केल्याची सुसाईड नोट लिहून, आपले जीवन संपवल्यामुळे फलटणसह सातारा जिल्हा हादरून गेला असून, या आरोपामुळे, रक्षकच झाले भक्षक, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत संबंधितांना तात्काळ निलंबनाचे आदेश देत संबधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांनी काल रात्री त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. आत्महत्ये प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर हे माझ्या मृत्यूला जबाबदार असल्याचे, मुंडे यांनी हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केले होते.मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली आहे. त्यांनी याप्रकरणी तातडीने जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
डॉ. मुंडे या गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील एका कथित वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणीच्या प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादामुळे त्या चर्चेत होत्या. या प्रकरणानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशीदेखील सुरू होती. या तणावामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यावेळी डॉ. संपदा मुंडे पोलीस अधिकाऱ्यावर थेट अत्याचार आणि छळाचे आरोप केले आहेत. त्यामुळे साताऱ्याच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये तिने तिच्या मृत्यूला पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर हे जबाबदार असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणी दोन्ही आरोपी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

No comments