लक्ष्मीपूजनाला महिला डॉक्टर व बनकर यांच्यात झाला होता वाद - रुपाली चाकणकर यांचा खुलासा ; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पारदर्शक तपास सुरु
फलटण (गंधवार्ता वृत्तसंस्था) दि.२७ ऑक्टोबर २०२५ - महिला डॉक्टर व पोलिसांनी केलेली परस्परविरोधी तक्रार, चौकशी होऊन ऑगस्ट २०२५ मध्येच निकाली काढण्यात आली होती, पोलिसांनी मोबाईल सीडीआर काढले असता जानेवारी ते मार्च दरम्यान गोपाळ बदने याचे कॉल डॉक्टर महिलेला आले होते, मार्च नंतर प्रशांत बनकर याचे कॉल आल्याचे दिसत आहेत. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फोटो काढण्यावरून महिला डॉक्टर व बनकर यांच्यात वाद झाला होता व 'त्या रात्री' संपदा यांनी बनकर यांना मेसेज देखील केले असल्याचा खुलासा करतानाच, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची पोलीस विभाग व फॉरेन्सिक लॅब असे सर्व विभाग पारदर्शकपणे तपास करत असून, राज्य महिला आयोग स्वतः यावर लक्ष ठेवून असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
महिला डॉक्टर आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर श्रीमती चाकणकर यांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयात जावून घटने विषयी माहिती घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रूपाली चाकणकर बोलत होत्या. यावेळी आमदार सचिन पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, उपविभागीय पोलीस अधीक्षक विशाल खांबे, महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दीपावलीच्या सणाला लक्ष्मी पूजन दिवशी फोटो व्यवस्थित काढण्यावरून डॉक्टर महिलेचा प्रशांत बनकर बरोबर वाद झाला होता, त्यावेळी ती डॉक्टर एका मंदिरात जाऊन बसली होती, तेव्हा तिला प्रशांत बनकर च्या वडिलांनी घरी आणले, मात्र ती तिथून निघून गेली ती, थेट हॉटेलमध्ये, तिथे तिने आत्महत्या केली असून या आत्महत्येचा तपास योग्य दिशेने सुरू असून त्या डॉक्टर युवतीला न्याय देण्यासाठी महिला आयोग या तपासावर लक्ष ठेऊन असल्याचे रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.
आत्महत्या प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी फॉरेन्सिक लॅब आणि लोकेशन डिटेक्शनची मदत घेतली जात आहे. तपासामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता राहणार नाही, असे सांगून शासकीय, अशासकीय आस्थापनांमधील अंतर्गत तक्रार निवारण समित्या प्रभावीपणे काम करतात की नाही यासाठी या समित्यांचे वर्षातून दोन वेळा ऑडिट व्हावे असे निर्देशितही महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर यांनी दिले.
.jpg)
No comments