आसू गावात अवैध दारूवर छापा ; गाडी कोणाची? तोतया पोलिसांचा संशय
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ सप्टेंबर २०२५ - फलटण तालुक्यातील पूर्व भागातील आसू गावात गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू धंद्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत मोठा मुद्देमाल जप्त झाल्याची चर्चा असून, संबंधित दारू विक्रेत्याला मारहाणही करण्यात आली. मात्र या प्रकरणाची नोंद कोणत्याही पोलिस ठाण्यात झालेली नाही. त्यामुळे ही कारवाई खरेच पोलिसांनी केली की तोतया पोलिसांनी, असा संशय निर्माण झाला आहे.
गणेश उत्सवात रात्री सुमारे ८.३० वाजता सायरन व अंबर दिवा असलेली गाडी थेट आसू गावातील मुख्य चौकात पोहोचली. गाडीतून आलेल्या कर्मचाऱ्यांनी दारू विक्रेत्याच्या घरी छापा टाकला, यावेळी मोठा मुद्देमाल सापडल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे, तर विक्रेत्यास मारहाणही करण्यात आली. परंतु, ही कारवाई पोलिसांनी केली की इतर कोणत्या विभागाने, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
फलटण ग्रामीण व बरड पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी अशी कोणतीही कारवाई न केल्याचे स्पष्ट केले. तसेच या संदर्भात कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गावात आलेली अंबर दिवा लावलेली गाडी नेमकी कोणाची? व ही कारवाई करणारे खरे अधिकारी होते की तोतया पोलिस, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.
आसू, पवारवाडी, हणमंतवाडी, गुणवरे परिसरात अवैध दारू विक्री बिनधास्त सुरू आहे. हातभट्टीच्या दारूचा स्वस्त दर व त्यातून मिळणारा बक्कळ नफा यामुळे विक्रेत्यांना कोणाचीही भीती राहिलेली नाही. उलट पैशाच्या जोरावर संबंधित विभाग गप्प बसत असल्याची चर्चा नागरिकांत आहे.
कारवाई तर होते, पण गुन्हे मात्र नोंदवले जात नाहीत. मग प्रत्येक महिन्यात अवैध धंद्यावर धाड घालणारी ही गाडी कोणाची? आणि एवढी मोठी आर्थिक उलाढाल कोणाच्या आश्रयाने चालते? यासोबतच आता तोतया पोलिसांनी ही कारवाई केली का? हा गंभीर प्रश्नही सर्वत्र उपस्थित होत आहे.
No comments