फलटण वनविभागाच्या वृक्षलागवडीवर प्रश्नचिन्ह - जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.४ सप्टेंबर २०२५ - फलटण तालुक्यातील उपळवे व नांदल या परिसरामध्ये सन २०२४ व २०२५ या दोन वर्षांत वनविभागाकडून वृक्षलागवड मोहिमा राबविण्यात आल्या. शासनाच्या १० कोटी वृक्षलागवड मोहिमेचा एक भाग म्हणून मोठ्या प्रमाणात रोपे लावल्याचा दावा करण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता कागदोपत्री दाखवलेल्या संख्येपेक्षा रोपसंख्या अत्यल्प असल्याचे समोर आले आहे.
वनविभागाने संबंधित परिसरात हजारो रोपे लावल्याचे दाखवले आहे. परंतु स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्षात खूपच कमी रोपे लागवड झालेली आहेत. अनेक ठिकाणी कोरडे खड्डेच दिसून येत असून, जिथे झाडे दाखवली गेली आहेत तिथे फारच कमी प्रमाणात वृक्ष अस्तित्वात आहेत.
स्थानिकांकडून गंभीर आरोप करण्यात येत आहेत की, पूर्वी खोदलेल्या खड्ड्यांचा पुन्हा वापर करून त्यात नवीन लागवड दाखवली जात आहे. यामध्ये खड्डा खोदाई व रोपांच्या खर्चाची वसुली नव्याने करून शासनाच्या निधीचा अपव्यय केला जात असल्याची चर्चा आहे. यामुळे शासनालाच फसविण्याचा प्रकार घडल्याचे नागरिकांचे मत आहे.
राज्य शासनाने पर्यावरण संवर्धन व हवामान बदल यावर नियंत्रण ठेवण्यासाठी १० कोटी वृक्षलागवड मोहिमेला मोठे प्रोत्साहन दिले होते. मात्र, फलटण वनविभागाच्या कारभारामुळे या मोहिमेवर हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. कागदोपत्री दाखवलेली आकडेवारी व प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती यामध्ये प्रचंड तफावत असल्याने विश्वासार्हता धोक्यात आली आहे.
या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा शासनाच्या निधीचा अपव्यय व पर्यावरणाशी संबंधित मोठा अन्याय दुर्लक्षित राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
No comments