Breaking News

लाडक्या बाप्पांना निरोप! भक्तिमय वातावरणात फलटण येथे गणपती विसर्जन

Farewell to beloved Bappa! Ganpati immersion in Phaltan in a devotional atmosphere

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ६ सप्टेंबर २०२५  : गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! च्या जयघोषात, भक्तिमय वातावरणात  पूजा, आरती करून, आपल्या लाडक्या बाप्पांना  गणेश भक्तांनी निरोप दिला व पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी केली. शहरात पंढरपूर पूल येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घरगुती गणेश विसर्जनासाठी गर्दी केली होती. तसेच शहरात सांस्कृतिक भवन व यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे विसर्जनासाठी कृत्रिम तलाव करण्यात आले होते.

    फलटण शहरातील बहुसंख्य मंडळांनी शनिवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत भक्तांच्या उपस्थितीत,  वाद्यांसह विसर्जन मिरवणूका काढल्या तर उर्वरित मंडळांनी सायंकाळी ७ वाजेपर्यंत मिरवणूका काढून, नीरा उजवा कालव्यामध्ये पंढरपूर पूल येथे गणेश मूर्तींचे विसर्जन केले.

    रात्री मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन केले होते. यामध्ये प्रामुख्याने शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाचा श्रीमंत रामेश्वर महागणपती, झुंजार गणेशोत्सव मंडळ बुधवार पेठ फलटण, मारवाड पेठ गणेशोत्सव मंडळ, मारवाड पेठ फलटण, श्री रंगारी महादेव गणेशोत्सव मंडळ बारस्कर चौक, रविवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळ फलटण, नवचैतन्य गणेशोत्सव मंडळ, अमरज्योती गणेशोत्सव मंडळ,  जय हिंद गणेशोत्सव मंडळ, उमाजी नाईक गणेशोत्सव मंडळ, श्रीमंत दगडी चाळ गणेशोत्सव मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गजानन चौक फलटण, सांस्कृतिक व कला क्रीडा गणेशोत्सव मंडळ लक्ष्मीनगर, फलटण, श्रीराम गणेशोत्सव मंडळ जुना सातारा रोड फलटण, बुरुड गल्ली गणेशोत्सव मंडळ फलटण, मलठणचा राजा गणेशोत्सव मंडळ मलटण फलटण, मलठण गणेशोत्सव मंडळ मलठण, पंचमुखी गणेशोत्सव मंडळ आदी मोठ्या मंडळांनी भव्य दिव्य अशा मिरवणुकीचे आयोजन केले होते.

    फलटण नगर परिषदेने नीरा उजवा कालव्या लगत यशवंतराव चव्हाण हायस्कुल समोर, कासार बावडी येथील विहिरीत विसर्जन व्यवस्था केली होती,  नीरा उजवा कालवा पुलावर मोठ्या गणेशमूर्ती विसर्जन करणेसाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती, रुग्णवाहिका व तातडीच्या वैद्यकीय उपचाराची सोय तसेच उत्तम जलतरण पटू आणि लाईफ जॅकेटसह अन्य व्यवस्था करण्यात आली होती.

    उप विभागीय पोलीस अधिकारी खांबे, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमांतकुमार शहा, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व त्यांचे सहकारी अधिकारी कर्मचारी, पोलीस पाटील, महसूल अधिकारी, कर्मचारी यांनी शहर व तालुक्यात चोख पोलीस बंदोबस्त नियुक्त केला होता, एक- दोन ठिकाणचे प्रकार सोडता कोठेही अनुचित प्रकार न होता संपूर्ण गणेशोत्सव शांततेत व भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

No comments