प्रभाग ९ मध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण; राझिया मेटकरींना नगरसेवक करण्याचा निर्धार
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२३ : फलटण शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये स्वातंत्र्यदिन तसेच स्वर्गीय हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, नगरसेवक सोमाशेठ जाधव, युवा नेते अभिजीतभैय्या निंबाळकर, रणजितसिंह भोसले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
प्रभाग ९ मध्ये नगरपरिषदेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय वृक्षारोपण, शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सिमेंट बेंच बसविणे अशा विविध उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रभाग ९ मधील विकासकामांना पुढील काळातही प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. “प्रभाग ९ मधील उमेदवार कु. राझिया मेटकरी यांच्या म्हणण्यानुसार यापुढेही प्रभागात विकासकामे होत राहतील. राझिया मेटकरी यांचा पराभव आमच्या जिव्हारी लागला आहे. त्यांना नगरसेवक करूनच दाखवणार असून, या प्रभागात संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभी करू,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही प्रभागातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले. “मेहबूब मेटकरी हा कधीही खचून न जाणारा माझा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्षाच्या माध्यमातून त्याला ताकद देण्यात येईल,” असे त्यांनी नमूद केले.
यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राझिया मेटकरी यांची हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना समितीवर संचालक म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली.
तसेच मेहबूब मेटकरी व फिरोज शेख यांनी मेटकरी गल्ली येथील मुस्लिम सभागृहाच्या दुरुस्तीसाठी केलेल्या मागणीची दखल घेत नगरपरिषदेच्या माध्यमातून १० लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर करण्यात आले. इतर समाजासाठी मेटकरी गल्ली, प्रभाग ९ येथे सभागृह बांधण्याच्या मागणीसाठी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास रणजितसिंह भोसले, बाळासाहेब कदम, अमोल सस्ते, फिरोजभाई आतार, रियाजभाई इनामदार, बाळासाहेब मेटकरी, शगीरभाई शेख, बबलूभाई मोमीन यांच्यासह आजी-माजी नगरसेवक आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रियाज इनामदार यांनी केले, तर कु. राझिया मेटकरी यांनी आभार मानले.

No comments