उळूंब जि. प. शाळेत वृक्षारोपण व शालेय साहित्याचे वाटप
विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश; मैत्री संस्था व विधी महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२३ - : मैत्री बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण आणि प्रियदर्शनी ज्ञानप्रबोधिनीचे विधी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने उळूंब (ता. फलटण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण, शालेय साहित्य व खाऊ वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला.
शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमास मैत्री सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष मंगेश सावंत, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अमित मोरे, कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ पत्रकार बेडकीहाळ सर, सरपंच संपत (भाऊ) कळंबे, अशोक कळंबे, फरांदवाडीचे केंद्रप्रमुख शेखर चांगण, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र अहिवळे, सहशिक्षिका गौरी जमदाडे, विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार बेडकीहाळ यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे सांगितले. विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अमित मोरे यांनी पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण ही काळाची गरज असून, यामध्ये विद्यार्थी आणि तरुणांनी अधिकाधिक योगदान द्यावे, असे आवाहन केले.
“प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे. केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या झाडांची नियमित काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे,” असा संदेश यावेळी देण्यात आला. भविष्यातही विविध ठिकाणी अशा प्रकारचे वृक्षारोपण व सामाजिक उपक्रम राबविण्याची गरज मान्यवरांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मैत्री संस्थेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी केले. सूत्रसंचालन संपत (भाऊ) कळंबे यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक राजेंद्र अहिवळे यांनी मानले.

No comments