आयडियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.7 सप्टेंबर : आयडियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या विशेष दिवशी विद्यार्थ्यांनी डायरेक्टर, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, HOD, स्पोर्ट्स टीचर, म्युझिक व डान्स टीचर, क्लार्क, शिपाई, मावशी अशा विविध भूमिका साकारल्या. या नवीन टीमने शाळेचे सर्व कामकाज शिस्तबद्धपणे पार पाडत खऱ्या अर्थाने शिक्षक दिन साजरा केला.
डायरेक्टर झालेल्या शर्व भोईटे यांनी शिक्षकांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. शाळेचे डायरेक्टर शिवराज भोईटे सर व सेंटर हेड सुचिता जाधव मॅडम यांनी " विद्यार्थी शिक्षकांशी " संवाद साधून त्यांचा आत्मविश्वास आणि जबाबदारीच्या जाणिवेचे कौतुक केले. शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना फुले, भेटकार्ड देऊन कृतज्ञता व आदर व्यक्त केला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी शिस्त, वेळेचे नियोजन, निर्णयक्षमता, जबाबदारी आणि नेतृत्वगुण यांचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवले. शिक्षक होण्याची भूमिका निभावताना शिक्षणक्षेत्र किती व्यापक आणि जबाबदारीने परिपूर्ण आहे याची जाणीव त्यांना झाली.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ. वैशाली शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. शिक्षणक्षेत्रातील त्यांची दूरदृष्टी, नवकल्पनाशीलता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेले अखंड प्रयत्न यामुळेच शिक्षक दिनाचा कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जबाबदारीचा अनुभव देऊन त्यांनी या दिवसाचे खरे महत्त्व अधोरेखित केले.
शिंदे मॅडम यांच्या प्रेरणेमुळे आयडियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेला शिक्षक दिन हा विद्यार्थ्यांसाठी केवळ एक कार्यक्रम न ठरता आयुष्यभरासाठी शिकवण ठरला.
No comments