Breaking News

बारामती परिमंडळात टीओडी मीटरमध्ये छेडछाडीची 57 प्रकरणे उघडकीस

57 cases of tampering with TOD meters revealed in Baramati circle

    बारामती (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.४ सप्टेंबर २०२५ -  - बारामती परिमंडळात टीओडी मीटरमध्ये छेडछाडीची 57 प्रकरणे उघडकीस आली आहेत. या  प्रकरणी संबंधित ग्राहकांवर विद्युत कायदा 2003 नुसार वीजचोरीची कारवाई करण्यात आली आहे. विजेची चोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तेंव्हा ग्राहकांनी कुठल्याही क्षणिक आर्थिक अमिषाला बळी पडून वीजमीटरमध्ये छेडछाड करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे महावितरणचे आवाहन आहे.

    महावितरणकडून अत्याधुनिक टीओडी (टाईम ऑफ डे) मीटर ग्राहकांना बसविले जात आहेत, टीओडी मीटर हे थेट महावितरणच्या नेटवर्क सर्व्हरला जोडलेले असल्याने या मीटरमध्ये छेडछाड केल्यास, मीटर नादुरूस्त झाल्यास महावितरणकडे तत्काळ त्याच क्षणी माहिती  (‍रिअल टाईम डाटा ) उपलब्ध होते. ज्या टीओडी मीटरमध्ये छेडछाड केल्याच्या नोंदी महावितरणकडे उपलब्ध झाल्या आहेत. त्या मीटरची प्रत्यक्ष पडताळणी करून बारामती परिमंडळातील 57  ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे.  त्यात बारामती मंडळातील 26, सोलापूर मंडळातील 21 तर सातारा मंडळातील 10 ग्राहकांचा समावेश आहे. या ग्राहकांवर विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 व 138 नुसार वीजचोरीची कारवाई करण्यात आली आहे.

    वीजमीटरमध्ये छेडछाड करून, वीज वाहिन्यांवर आकोडे टाकून वा अन्य मार्गाव्दारे वीजचोरी करणे हा विद्युत कायदा 2003 नुसार  गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा आहे. त्यात  सहा पट आर्थिक दंड व 6 महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या तुरूंगवासाच्या शिक्षेची तरदूद आहे. तेंव्हा ग्राहकांनी कुठल्याही अमिषाला व क्षणिक आर्थिक लाभाला बळी पडून वीजचोरीचा प्रयत्न करू नये, असे महावितरणचे आवाहन आहे.

No comments