१२ लाख ७० हजार रुपये किंमतीचे ७४ मोबाईल मूळ मालकांना परत - फलटण ग्रामीण पोलिसांची कामगिरी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ सप्टेंबर २०२५ - फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने चालविलेल्या विशेष मोहिमेत १२ लाख ७० हजार रुपयांच्या किमतीचे एकूण ७४ हरविलेले मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले.
जानेवारी २०२५ पासून ऑगस्ट २०२५ पर्यंत ही कामगिरी पार पडली असून, यामध्ये केवळ जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांतच ३९ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
गहाळ दाखल झालेले मोबाईल सीईआयआर (CEIR) पोर्टलच्या माध्यमातून तपासात घेतले गेले. विविध तांत्रिक माहितीचा आधार घेऊन हे मोबाईल राज्यातील इतर जिल्ह्यांमधून तसेच कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांतूनही परत मिळविण्यात आले. अनेक वेळा मोबाईल वापरकर्त्यांशी संपर्क साधून, चिकाटीने पाठपुरावा करत कुरीयर व इतर मार्गांनी मालकांकडे सुपूर्द केले. विशेष म्हणजे, माऊली पालखी मेळाव्यात हरविलेले काही मोबाईलसुद्धा परत मिळवून मालकांना कुरीयरने पाठविण्यात आले.
या कामगिरीमुळे मोबाईलधारकांनी समाधान व्यक्त केले असून, अशा मोहिमा पुढेही सुरू राहतील, असे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी सांगितले.
ही मोहीम मा. तुषार दोशी (पोलीस अधीक्षक), मा. वैशाली कडुकर (अपर पोलीस अधीक्षक) आणि मा. विशाल खांबे (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांच्या सूचनांनुसार हाती घेण्यात आली होती.
या यशस्वी कामगिरीत पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक, यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकातील पो. उपनिरीक्षक जी. बी. बदने, पो. हवा. नितिन चतुरे, श्रीनाथ कदम (तात्या), अमोल जगदाळे, हनुमंत दडस यांचा मोलाचा सहभाग राहिला.
No comments