Breaking News

कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

Will not allow injustice to be done to farmers including traders of Qureshi community – Deputy Chief Minister Ajit Pawar

    मुंबई दि. 6 : कुरेशी समाज हा परंपरेने मांस व्यापाराशी जोडलेला असून महाराष्ट्राच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे. त्यामुळे या समाजाच्या व्यापाऱ्यांवर आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात कुरेशी समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा

    बैठकीदरम्यानच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी यासंदर्भात दूरध्वनीवर चर्चा करुन कुरेशी समाजाला जनावरांची वाहतूक करत असताना येत असलेल्या अडचणींबाबत माहिती दिली. जनावरांची वाहतूक करण्यासंदर्भात असलेल्या कायद्यात बदल करण्याबाबत कुरेशी समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करुन निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्याकडे केली.

    कुरेशी समाजाच्या व्यापारी आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. कुरेशी समाजाच्या प्रतिनिधींनी आपल्या विविध मागण्यांबाबत पुकारलेला संप मागे घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले. त्यावर संघटनेच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद देत संप मागे घेतल्याचे जाहीर केले.

    या बैठकीस आमदार सना मलिक, आमदार संजय खोडके, माजी मंत्री नवाब मलिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, फेडरेशन ऑफ महाराष्ट्रीय मुस्लिम, मुंबई अमन समिती, अल – कुरेश सामाजिक विकास मंडळ, ऑल इंडिया जमीयतुल कुरेश संघटना, ऑल महाराष्ट्र जमीयतुल कुरेश संघटना या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments