गिरवी नाका येथे संशयास्पद इसमाकडून बेकायदेशीर एअरगन व मोटारसायकल जप्त
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.०७ ऑगस्ट २०२५ - फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, गिरवी नाका येथे, लॉ कॉलेजसमोर काल दि.६ रोजी सायंकाळी संशयास्पद हालचाली करत असलेल्या इसमाची झडती घेतली असता, त्याच्याकडून 1,000/- रुपये किमतीची एअरगन पिस्टल व अंदाजे 40,000/- रुपये किमतीची काळ्या रंगाची, पुढे व पाठीमागे नंबर नसलेली स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
गुन्हा दि. 06/08/2025 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडला असून, दि. 07/08/2025 रोजी पहाटे 1.40 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संशयास्पद हालचाली करत असलेल्या व्यक्तीस थांबवून चौकशी केली असता, त्याने समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे त्याची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्या पँटमध्ये खोवलेली एअरगन पिस्टल मिळाली. त्याच्याजवळील मोटारसायकलचीही कोणतीही नोंद नव्हती. त्यामुळे मोटारसायकल चोरीची असण्याची शक्यता असून यासंबंधी तपास सुरू आहे.
या प्रकरणी अजय बाळु वाघमोडे (रा. मौजे तिर्वंदी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यास अटक करण्यात आली असून त्याच्यासोबत असलेला एक इसम फरार आहे. याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 124 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार पूनम बोबडे, फलटण शहर पोलीस ठाणे करत आहेत.
No comments