Breaking News

मुलांना मैदानी खेळ खेळवा - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ; श्रीमंत रामराजे यांच्या शुभहस्ते मुधोजी क्लबचे भूमिपूजन

Let the children play outdoor games - Shrimant Ramraje Naik Nimbalkar; Bhoomi Pujan of Mudhoji Club with the auspicious hands of Shrimant Ramraje

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ ऑगस्ट २०२५ - मोबाईल गेम्सला अल्टरनेटिव्ह पर्याय म्हणून मैदानी खेळ खेळवले पाहिजेत, हल्ली मुलांच्या जीवनातून मैदानी खेळ लुप्त होत चालले असून मुलांच्या मोबाईल खेळाला आळा बसणे गरजेचे आहे. आपले मैदानी खेळ जिवंत राहिले पाहिजेत असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

    फलटण येथील मुधोजी क्लबच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजना प्रसंगी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी मुधोजी क्लबच्या उपाध्यक्षा श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर,मुधोजी क्लबचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, ॲड.गीते मॅडम, सेक्रेटरी राजीव नाईक निंबाळकर, खजिनदार हेमंत भोसले, सातारा क्लबचे विठ्ठलराव जाधव, टीसी कॉलेजचे राहुलशेठ वाघोलीकर, फलटण दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, माजी उपनगराध्यक्ष व क्लबचे विश्वस्त नितीनभैय्या भोसले, समर जाधव,डॉ.महेश बर्वे, महादेव माने, व्यवस्थापक बाळासाहेब बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.

    श्रीमंत रामराजे पुढे बोलताना म्हणाले, मुधोजी क्लबच्या माध्यमातून इतर खेळाबरोबर क्रिकेट खेळाचे ग्राउंड व प्रशिक्षण केंद्र सुरू करून फलटणच्या युवकांना क्रिकेट खेळातून संधी उपलब्ध करून देण्याचे क्लब कमिटी मेंबरला सांगितले. स्वातंत्र्यपूर्व काळातील मधोजी क्लब आर्थिक गर्तेत असताना मी नगराध्यक्ष असताना फलटणच्या जनतेचा जिव्हाळ्याचा मुधोजी क्लब उर्जित अवस्थेत आणला त्यामुळेच फलटणच्या नागरिकांना विविध मैदानी खेळाचे लाभ घेता आले.मी जेव्हा पुण्यात शिकत असताना शाळेच्या ग्राउंड वर देशातील दिग्गज क्रिकेटपटू खेळताना पाहिले, ते पाहूनच मी क्रिकेट खेळायला लागलो. कमिन्स कंपनीच्या माध्यमातून विविध खेळांसाठी मदत करण्याचे कंपनीच्या व्यवस्थापनेशी बोललो आहे. तालुका क्रीडासंकुलनाला आमच्या पूर्वजांनी जमीन दिली आहे. तिथेही अधिकची सुविधा देणे गरजेचे असल्याचे यावेळी रामराजे यांनी सांगितले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले मधोजी क्लबची स्थापना १९१६ सली झाली काळानुसार क्लबच्या इमारतीचे नूतनीकरण करणे आवश्यक होते.क्लबच्या माध्यमातून टेनिस खेळाबरोबर अनेक खेळाचे खेळाडू निर्माण झाले.नवीन इमारत बांधत असताना, सध्या असलेली चार टेनिस कोर्ट पैकी, एक कोर्ट जाणार आहे, मात्र त्या बदल्यात आम्ही दोन नवीन कोर्ट तयार करणार असून ती सिंथेटिक कोर्ट असणार आहेत, त्याचबरोबर अद्यावत जिम,योगा हॉल, टेबल टेनिस,कॅरम, स्विमिंग पूल फलटणकरांना उपलब्ध होणार आहेत.

    या प्रसंगी मधोजी क्लबच्या उपाध्यक्ष श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे मॅडम यांनी केले तर आभार बाळासाहेब बाबर यांनी मानले.

No comments