फलटणमध्ये दुय्यम निबंधक कार्यालयात भ्रष्टाचाराच्या चर्चेला ऊत ; कारवाईची मागणी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ सप्टेंबर २०२५ - फलटण शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक करून अधिकचे पैसे उकळले जात असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. दस्त नोंदणीची अधिकृत फी शासनाने निश्चित केलेली असतानाही, व्यवहार मंजूर करून घेण्यासाठी नागरिकांकडून जादा रक्कम घेतली जात असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
दस्त नोंदणीमध्ये जाणूनबुजून काहीतरी चुका काढल्या जात असून, मध्यस्त्यांना सांगून लुटण्याचा गोरख धंदा फलटण मध्ये राजरोसपने सुरु आहे, तसेच इतर तालुक्यात संबंधित विभागाची कार्यालय असताना खटाव खंडाळा तसेच इतरही तालुक्यातील दस्त नोंदणीसाठी फलटण कार्यालयाची निवड केली जात असून त्या खरेदी खतात अनंत अडचणी असताना मात्र ते दस्त लाखो रुपये घेऊन केले जात आहेत.
तसेच व्यवहार मंजूर करून घेण्यासाठी नागरिकांकडून जादा रक्कम घेतली जात असून, त्या खरेदी खताची रेडी रेकणर प्रमाणे होणारी रक्कमही कमी दाखवून शासनाची फसवणूक करीत, स्वतःची झोळी मात्र दररोज लाखो रुपयांनी भरण्याचा सपाटा लावला जात आहे, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
याशिवाय काही दस्त नोंदणीमध्ये प्रॉपर्टीचे व्हॅल्यूवेशन कमी दाखवून नोंदी केल्या जात असल्याची माहिती समोर येत असून, अशा प्रकरणांत लाखो रुपयांचे व्यवहार टेबलाखाली होत असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे शासनाला मोठ्या प्रमाणावर महसुली तोटा होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या सर्व व्यवहारांमुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील कारभार पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांत असंतोष वाढत असून, संबंधित प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
No comments