Breaking News

मुधोजी महाविद्यालयाची मध्यवर्ती युवा महोत्सवात उत्तुंग कामगिरी

Mudhoji College excels in Central Youth Festival

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा-  दि.२१ सप्टेंबर २०२५ -  शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती युवा महोत्सव बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज येथे आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी महाविद्यालयाने विविध कला प्रकारांमध्ये सहभाग नोंदवून उत्तुंग यश संपादन केले.

    युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठाच्या स्तरावर अनेक महाविद्यालयांमध्ये लोकनृत्य साठी जनरल चॅम्पियनशिप मिळवणे ही सोपी बाब नसते. मात्र मुधोजी महाविद्यालयाच्या कलाविष्कार विभागाने इतिहासाला साजेसा ठसा उमटवत लोकनृत्य प्रकारात ही चॅम्पियनशिप मिळवली. याशिवाय इतर अनेक बक्षिसेही पटकावण्यात आली.

    शिवाजी विद्यापीठातील शेकडो महाविद्यालयांमधून पहिल्या पाच क्रमांकात स्थान मिळवणे ही कठीण बाब मानली जाते. मात्र मुधोजी महाविद्यालयाने आपली परंपरा कायम ठेवत सांघिक फिरता उपविजेता चषक पटकावला आहे.

    या विजेत्या टीमला मार्गदर्शन करणारे प्रा. वळेकर, प्रा. गायकवाड, गायत्री पवार मॅडम, देशमुख मॅडम, शेटे सर, दोशी सर तसेच कमिटीतील सर्व प्राध्यापकवृंद, त्यांना सातत्याने साथ देणारे माजी विद्यार्थी कोरिओग्राफर आणि इतर सर्व टीम यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

    मुधोजी महाविद्यालयाची कामगिरी :
१) शॉर्ट फिल्म – प्रथम क्रमांक
२) शास्त्रीय तालवाद्य – तृतीय क्रमांक
४) ३) पाश्चिमात्य समूहगीत – पाचवा क्रमांक
५) लोकसंगीत वाद्यवृंद – चतुर्थ क्रमांक
६) पथनाट्य – तृतीय क्रमांक
७) प्रहसिका – तृतीय क्रमांक
८) लोकनृत्य – प्रथम क्रमांक
९) लोकनृत्य – जनरल चॅम्पियनशिप 

    सांघिक फिरता उपविजेता चषक

    महाविद्यालयाचा इतिहास पाहता मुधोजी महाविद्यालय नेहमीच कलाविष्कारात चर्चेत राहिले आहे. यावर्षीच्या निकालानुसार सातारा जिल्ह्यातील एका महाविद्यालयाला फक्त एक बक्षीस मिळाले असून उर्वरित सर्व बक्षिसे बाहेरील जिल्ह्यात गेली आहेत. अशा स्थितीत मुधोजी महाविद्यालयाने मिळवलेली एकूण सात बक्षिसे ही जिल्ह्यात व विद्यापीठात आपले अग्रस्थान सिद्ध करणारी ठरली आहेत.

    फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष प्राचार्य देशमुख सर, ट्रेझरर हेमंत रानडे, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

No comments