बेटी बचाव-बेटी पढाव योजनेचा शंभर टक्के निधी खर्च करा - जिल्हाधिकारी संतोष पाटील
सातारा दि. 22 : बेटी बचाव-बेटी पढाव योजनेंतर्गत मिळालेला निधी शंभर टक्के खर्च करा. या निधीतून सातारा जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढेल यासाठी महिला व बाल विकास विभागाने प्रभावी कार्यक्रम राबवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात बेटी बचाव -बेढी पढाव जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला महिला व बाल विकास अधिकारी राजश्री बने, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( बाल कल्याण) नागेश ठोंबरे, पर्यवेक्षाधिकारी तुषार सुरत्रांन, संरक्षण अधिकारी अजय सपकाळ आदी उपस्थित होते.
मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी बेटी बचाव-बेटी पढाव योजनेंतर्गत गर्भनिदान प्रतिबंध अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करुन त्याची जनजागृती करा,असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, या अधिनियमांबाबत जनजागृती व्हावी यासाठी आरोग्य विभागाच्या मदतीने शिबीरांचे व चर्चासत्रांचे आयोजन करावे. जिल्हा महिला व बाल विकास विभागाने बेटी बचाव-बेटी पढाव योजनेची नवनवीन कल्पनेतून प्रभावी अंमलबजावणी करावी. यासाठी आराखडा तयार करावा. तज्ञ व्यक्तींकडून जींगल्स, व्हिडीओ तयार कराव्यात. शेवटच्या घटकांपर्यंत या योजनेची प्रचार व प्रसिद्धी करावी.
बाल विवाह होऊ नयेत म्हणून त्याचीही जनजागृती करा, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील बाल गृहातील मुलांना सोयी-सुविधा मिळतात का याची पहाणी करावी. आणखीन सुविधा पाहिजे असतील तर त्या सीएसआर फंडातून देता येईल यासाठी प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिल्या.
No comments