Breaking News

पवार गल्ली नवरात्र उत्सवात दि.२९ रोजी "होम मिनिस्टर

Pawar Galli Navratri festival on the 29th with "Home Minister

    फलटण - महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने पवार गल्ली नवरात्र उत्सव 2025 मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा होत आहे. जरी हा उत्सव केवळ तिसऱ्या वर्षात साजरा होत असला तरी अनेक वर्षांची परंपरा असल्यागत या मंडळाच्या उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

    नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रोज सायंकाळी होणाऱ्या आरतीत मान्यवर व्यक्ती सहभागी होत असून, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरत आहे. पंचक्रोशीतील महिला, वयोवृद्ध मंडळी तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने यात सहभागी होत आहेत.

    यंदाच्या उत्सवात जय तुळजाभवानी दांडिया ग्रुपच्या दांडिया नृत्यामुळे कार्यक्रमांना रंगत आली आहे. तसेच माहेरवाशीन महिलांचा सन्मान ‘खाना नारळणी ओटी’ भरून करण्यात येतोय. लहान मुलांसाठी गायन-नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात येत असून, विजेत्या मुलांना शालेय उपयोगी वस्तूंची बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते दिली जात आहेत.

    दरम्यान, येत्या 29 सप्टेंबर रोजी “होम मिनिस्टर” (खेळ पैठणीचा) हा लोकप्रिय कार्यक्रम प्रसिद्ध कलाकार शेखर ओहाळ यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे. महिलांसाठी आकर्षक बक्षिसांची सोय असून, “यंदाची होम मिनिस्टर कोण ठरणार?” याकडे सर्वांची उत्सुकता लागली आहे.

    नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी वाजत-गाजत देवीची मूर्ती मंडपात आणण्यात आली. पुढील दिवसांमध्ये दांडिया, गरबा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्सवात रंगत वाढत आहे. स्थानिकांसह बाहेरगावाहूनही शुभेच्छा संदेशांचा ओघ सुरू आहे.

    या भव्य “होम मिनिस्टर” कार्यक्रमाचे आयोजन युवा उद्योजक सचिनशेठ गानबोटे यांनी केले असून, अधिकाधिक महिलांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन पवार गल्ली नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments