गुंठेवारीच्या दस्तामध्ये आर्थिक देवाणघेवाण ; फलटणच्या दुय्यय निबंधक कार्यालयाच्या विरोधात वकिलांची तक्रार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२९ सप्टेंबर २०२५ - फलटण शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना, नागरिकांची अडवणूक करून, अधिकचे पैसे उकळणे, दस्त नोंदणीमध्ये प्रॉपर्टीचे व्हॅल्यूवेशन कमी दाखवून नोंदी केल्या जात असल्याच्या तक्रारी येत असतानाच, गुंठेवारीचे दस्त वकीलांनी नोंदवल्यास त्यामध्ये कायदेशीर अडचणी सांगून, सदरचे दस्त फेटाळले जातात व तेच दस्त खाजगी व्यक्ती कडून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण करुन नोंदवले जात असल्याची तक्रार करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी वकिलांनी केली असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना वकिलांना दुय्यम वागणूक दिली जात असून, खाजगी व्यक्तींना आर्थिक हितसंबंधातून आग्रक्रमाची वागणूक देत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. कायद्याची पदवी घेतलेल्या वकिलांना देखील निबंधक कार्यालयात अवमान सहन करावा लागत असल्यामुळे, फलटण वकील संघ या निबंधक कार्यालयाच्या विरोधात आवाज उठवणार असल्याचीही चर्चा सुरू आहे.
निबंधक कार्यालयात कायद्याने प्रतिबंध असलेल्या गुंठेवारीचे दस्त नोंदवले जातात व सदरचे दस्त वकीलांनी नोंदवल्यास त्यामध्ये कायदेशीर अडचणी सांगून सदरचे दस्त फेटाळले जात आहेत. आणि तेच दस्त खाजगी व्यक्ती कडून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण करुन नोंदवले जात आहेत. शासकीय कार्यालयातच सर्वसामान्यांना लुटण्याचा गोरख धंदा फलटण मध्ये राजरोसपने सुरु आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
फलटण येथील दस्त नोंदणी कार्यालयामध्ये नोंदणीकृत दस्त लेखनिक सोडून खाजगी व्यक्ती बेकायदेशीर रित्या दस्त नोंदणी करीत आहेत. दोन्ही दस्त कार्यालयामध्ये खाजगी व्यक्तींचा सुळसुळाट असून, बेकायदेशीर रित्या दस्त नोंदणी करीत आहेत. यातुन प्रचंड बेकायदेशीर आर्थिक उलाढाल होत असून त्यामध्ये सर्व सर्वसामान्य माणूस व शेतकरी भरडला जात आहे.
No comments