Breaking News

विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता ओळखून त्या दृष्टीने त्याला दर्जेदार शिक्षण मिळावे : कमिन्स कार्यकारी उपाध्यक्ष आणि अध्यक्ष ऑपरेशन्स बॉनी फेच

 

Students should be given quality education by recognizing their intelligence: Cummins Executive Vice President and President of Operations Bonnie Fetch

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० ऑगस्ट २०२५ - विद्यार्थी कोणत्या सामाजिक स्तरातून आला, हे महत्वाचे नाही, तर त्याची बुध्दीमत्ता ओळखून त्यादृष्टीने त्याच्या शिक्षणाची दिशा ठरवून मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करीत त्यांच्या सामाजिक प्रगतीसाठी दर्जेदार शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे स्पष्ट प्रतिपादन कमिन्स कार्यकारी उपाध्यक्ष बॉनी फेच यांनी केले.

    कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून फलटण नगर परिषद राणीसाहेब श्रीमंत लक्ष्मीदेवी नाईक निंबाळकर शाळा क्रमांक ८ या प्राथमिक शाळेचा कायापालट झाला आहे. कंपनीच्या सीएसआर फंडातून शाळेचे कंपाऊंड, रंगरंगोटी, बोलक्या भिंती, स्टेज, मैदानावर पेव्हर ब्लॉक, मुलामुलींसाठी स्वच्छतागृह आदी भौतिक सुविधांसह डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन कमिन्स कार्यकारी उपाध्यक्ष आणि अध्यक्ष ऑपरेशन्स बॉनी फेच (अमेरिका) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कमिन्स मुख्य पुरवठा साखळी अधिकारी,ग्लोबल ऑपरेशनल एक्सलन्स आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन लीडर आणि बोर्ड सदस्य शुभंकर चटर्जी, कमिन्स ईएसजी कार्यक्रम संचालक आणि गुणवत्ता एफई लीडर,भारत क्षेत्र जयदीप चॅटर्जी,पुरवठा साखळी,कमिन्स इंडिया नीरज देशपांडे, मोलीसा,कमिन्स इंडिया सीआर लीड,मेगा साइट फलटण प्रविण गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता,सरोज बडगुजर, सुप्रिया चव्हाण, नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल मोरे, शहर अभियंता गायकवाड, उपमुख्याधिकारी तेजस पाटील, बीआरसीच्या केंद्र समन्वयक दमयंती कुंभार, प्रशालेचे मुख्याध्यापक दिपक पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

    फलटण नगर परिषद आणि प्रशालेच्या स्वागताने बोनी फेच या परदेशी पाहुण्या भारावून गेल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळा पाहून या परदेशी पाहुण्यांसह कंपनीचे अन्य अधिकारी खुष झाले.

    फलटण शहर सर्वांगीण विकास प्रक्रियेत आघाडी घेत असताना, त्या विकास प्रक्रियेत कमिन्स इंडिया कंपनी कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून हातभार लावते आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद असल्याचे आवर्जून सांगत फलटण शहराच्या शैक्षणिक विकासासाठी कमिन्स फाऊंडेशनच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचे बोनी फ्रेंच यांनी विशेष कौतुक केले.

    बॉनी म्हणाल्या, प्रारंभी लेझीम, ढोल ताशा आणि तुतारीच्या निनादात नगर परिषद आणि प्रशालेच्यावतीने केलेले स्वागत यामुळे मन आनंदून गेले. मला ५ मुले १० नातवंडे आहेत. या हसऱ्या मुलांना पाहून मला माझ्या मुलांनातवंडांची आठवण झाली. माझे मन भारावून गेले.

    कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून येथे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या भौतिक सुविधा, आकर्षक सजावट यासोबतच चांगल्या पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी शिक्षकांचा सुरु असलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. मुलांच्या सुरक्षेतेची काळजीही घेतल्याचे पाहून अतिशय आनंद वाटला.

    नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल मोरे म्हणाले, फलटण शहराच्या विकासात कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या योगदानातून शहराच्या सुशोभीकरण बरोबरच पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने शहरात वृक्षारोपण,बागबगीचा, सार्वजनिक स्वच्छतागृहांची झालेली कामे शहराचे सौदर्य वाढवत आहेत. यामुळे फलटण नगर परिषदेने माझी वसुंधरा, स्वच्छ भारत अभियान या उपक्रमात आघाडी घेऊन राज्य पातळीवर यश मिळविल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. शाळेसाठी पुरवलेल्या सुविधांमुळे येथील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

    कमिन्स फाऊंडेशनचे प्रविण गायकवाड म्हणाले, सन २०१९ मध्ये  शाळेत अनेक भौतिक सुविधांची कमतरता होती. परिणामी खाजगी शाळांच्या तुलनेत विद्यार्थी संख्याही कमी होत होती. अशा स्थितीत कमिन्स इंडिया कंपनीच्या सीएसआर फंडातून शाळेचे कंपाऊंड, रंगरंगोटी, बोलक्या भिंती, स्टेज, मैदानावर पेव्हर ब्लॉक, मुलामुलींसाठी स्वच्छतागृह, वर्ग खोल्या आणि व्हरांड्यातील फरशी कामे पूर्ण करताना डिजिटल युगात या प्रशालेतील विद्यार्थी मागे राहू नयेत, यासाठी डिजिटल क्लासरुमची  उभारणी केली. गेल्या ५/६ वर्षांत शाळेचे बदललेले रुप आणि शिक्षकांनी घेतलेली मेहनत यामुळे विद्यार्थी संख्येत दुपटीने वाढ झाली आहे ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्ही खूप आनंदी आहोत. गेल्या ५/६ वर्षांत फलटण शहराचे बदलत असलेले चित्र यामध्ये मुख्याधिकारी निखिल मोरे आणि त्यांचे सहकारी तसेच प्रशालेतील शिक्षक यांचे मोठे योगदान आहे.

    प्रारंभी बोनी फेच यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. नगर परिषद शिक्षण मंडळाचे नितिन खाडे, प्रशालेचे मुख्याध्यापक दिपक पवार, संदिप निकम, गणेश काशिद, नितिन खाडे, सौ. पाहुणे, सौ. निंबाळकर यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन यथोचित स्वागत केले. योगेश गोडसे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

No comments