Breaking News

विजेचे स्मार्ट मीटरच्या सक्ती बाबत कोळकी ग्रामस्थ आक्रमक ; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

Kolki villagers aggressive regarding the mandatory installation of smart electricity meters; Villagers warn of agitation

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० ऑगस्ट २०२५ - फलटण शहरालगत असणाऱ्या कोळकी या उपनगरात वीज वितरण कंपनीच्या वतीने वीज ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता स्मार्ट  मीटर बसवण्यात येत आहेत.

    याबाबत कोळकी येथील ग्रामस्थ यांनी संताप व्यक्त करून ६ ऑगस्ट २०३५ रोजी फलटणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन आपला रोष व्यक्त केला आहे.

    वीज वितरण कंपनीच्या वतीने जुने मीटर काढून हे नवीन स्मार्ट मीटर बसवल्यामुळे वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलाचा अतिरिक्त भार भुर्दंड म्हणून सोसावा लागत आहे. अगोदरच सर्वसामान्य रहिवाशांची आर्थिक स्थिती बिकट होत आहे, अशातच स्मार्ट मीटरने येणाऱ्या वाढीव वीज बिलाने नागरिक हैराण होत आहेत.

    कोळकी येथील सातारा जिल्हा भाजपाचे सरचिटणीस जयकुमार शिंदे यांच्या समवेत कोळकी उपनगरातील ग्राहकांनी भाजपचे पदाधिकारी आणि भाजपचे ग्रामपंचायत सदस्य यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करून,  आम्हास या स्मार्ट मीटरच्या बाबतच्या असणाऱ्या तक्रारीमुळे आणि ग्राहकांना वाढीव वीज बिलाचा फटका बसत असल्यामुळे या स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, याबाबत पूर्वकल्पना निवेदनाद्वारे दिली आहे. याबाबत वीज वितरण कंपनीचे फलटण येथील कार्यकारी अभियंता यांनी  त्वरित उपाययोजना करावी. आणि स्मार्ट मीटर बसवण्याचे काम थांबवण्यात येऊन योग्य वीज बिल नागरिकांना आकारण्यात यावे. अन्यथा आम्हाला वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही जयकुमार शिंदे यांनी दिला आहे.

    यावेळी  माजी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे , कामगार नेते पै. बाळासाहेब काशिद , पै. संजय देशमुख, संदीप नेवसे , उदयसिंह निंबाळकर ,किरण जाधव,रणजीत जाधव , प्रदिप भरते, देविदास जाधव, यशवंत जाधव, ज्योतिराम दंडिले, व कोळकी येथील नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.

No comments