फलटण - सांगली राष्ट्रीय महामार्गाच्या कामास स्थानिकांचा विरोध
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० ऑगस्ट २०२५ - दुधेबावी ता. फलटण गावात फलटण-दहिवडी-मायनी-विटा-सांगली राष्ट्रीय महामार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160) कामास सुरुवात झाली असून प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता काम सुरु केले असून रस्त्यासाठी जाणाऱ्या जमिनीचा मोबदला मिळाल्याशिवाय रस्त्याचे काम होऊ देणार नसल्याचे दुधेबावी ता. फलटण येथील शेतकऱ्यांनी ठामपणे सांगितले. नुकतेच दुधेबावीत शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम बंद केले असून पुढे माण तालुक्यात मोगराळे आणि बिजवडी येथेही काम बंद पाडले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
दुधेबावी गावातील ज्या शेतकरी बांधवांची घरे, दुकाने, झाडे रस्त्यामध्ये जाणार आहेत त्यांना मोबदला मिळाला पाहिजे. प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर जर म्हणत असतील की सध्या आहे एवढाच रस्ता होणार आहे तर मग आमच्या शेतात मोजणी करून खांब कशासाठी रोवले आहेत.
शेतकऱ्यांचे नुकसान करून सरकारला नेमका कसला विकास करायचा आहे असा सवालही यावेळी दुधेबावीतील शेतकऱ्यांनी विचारला आहे. तसेच आमचा या महामार्गाला विरोध नाही मात्र आमच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाल्याशिवाय रस्त्याचे काम होऊ देणार नसल्याची भूमिका दुधेबावी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. तसेच वेळ आली तर आंदोलन आणि आत्मदहन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
No comments