Breaking News

बारामती शहरात मुख्य ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा-उपमुख्यमंत्री अजित पवार

Install ‘signal system’ at key locations in Baramati city – Deputy Chief Minister Ajit Pawar

    बारामती, दि.१०: सार्वजनिक वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्याच्यादृष्टीने शहरातील मुख्य १० ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा, चौकाला नावे देण्याची कार्यवाही करण्यासह रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्ते अतिक्रमणमुक्त करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

    श्री.पवार यांनी शहरातील तीन हत्ती चौक परिसर व ध्वजस्तंभ, गुणवडी चौक येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स, जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी निवासस्थानाच्या सुरु असलेल्या विकास कामांची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

    श्री. पवार म्हणाले, नटराज नाट्य कला मंडळाच्या प्रांगणात ३० मीटर उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात येत असून त्यांचे गतीने काम पूर्ण करा. नगर परिषद कार्यालयाच्या शेजारील जागेवर हुतात्मा स्तंभ उभारण्याच्यादृष्टीने कामे करतांना स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या ठळक घटनांचा समावेश करावा. परिसरात विद्युत रोषणाई होईल, याबाबत दक्षता घ्यावी. नगर परिषदेच्या मालकीच्या इमारतीचे स्पष्ट नामफलक लावावेत. सेवा रस्त्याची आवश्यक ती सर्व कामे पूर्ण करावीत.

    जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता सर्व सुविधांनीयुक्त निवासस्थानाचे बांधकाम करावे. नागरिकांची वर्दळ विचारात घेता गुणवडी चौक येथील व्यापारी संकुलतील फरश्या, रंगरंगोटी, रस्ते आदी कामे गतीने पूर्ण करा, अशा सूचना श्री.पवार यांनी दिल्या.

    शहरात उभारण्यात येणाऱ्या सेंट्रल पार्कच्या समोरील जागेवर महापुरुषांचे पुतळे बसविण्याचे काम करण्यात येणार असून त्याबाबत आराखड्याचे सुधारित सादरीकरण सादर करावे.  बारामती बसस्थानक परिसर स्वच्छ करावा. परिसरात अधिक सावली देणारी वृक्षांची लागवड करावी.

    तालुक्यात विविध विकासकामे सुरु असून ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि गतीने पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे. वाहतूक सुरळीत ठेवण्याच्यादृष्टीने प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनीही वाहतूक सुरक्षा विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

    यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी पंकज भुसे, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, माजी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर आदी उपस्थित होते.

No comments