वेण्णा लेकवरील ड्रोन शोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले उद्घाटन
सातारा दि.४- महाबळेश्वर येथील महापर्यटन उत्सवांतर्गत वेण्णा लेक येथे आयोजित नेत्रदीपक ड्रोन शोचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रात पर्यटनासाठी खूप मोठा वाव आहे. जगभरातील तसेच देशातील पर्यटक आकर्षित करून महाराष्ट्र राज्य पर्यटनाच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांकावर राहील यासाठी प्रयत्न करणारा असल्याचे श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार अतुल भोसले उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महापर्यटन उत्सव महाबळेश्वरचे अत्यंत देखणे व सुंदर पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला महाराष्ट्रातील पर्यटकांनी मोठा प्रतिसाद दिला. पुढील काळातही अशा पद्धतीने विविध ठिकाणी उत्सवांचे आयोजन केले जाईल, असेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.
ड्रोनच्या माध्यमातून आकाशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, प्रतापगड, तुतारी वाजवणारा माणूस, ढोल वाजवणारा माणूस, मंदिर यासह विविध कलाकृती तयार करण्यात आल्या. उद्घाटनाच्या प्रारंभी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी लेझर शोचाही आनंद घेतला. कार्यक्रमाला पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
No comments