सत्तेसाठी आणि राजकारणासाठी 'रामराजे' कोणत्याही थराला जाऊ शकतात - शिवरूपराजेंची टीका
फलटण, दि. ३१ जानेवारी : "महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आमच्या नेत्या श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांची आज ऐतिहासिक नियुक्ती झाली. या महत्त्वाच्या प्रसंगी आणि स्व. अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी फलटणचे आमदार सचिन पाटील मुंबईत हजर राहिले. मात्र, ज्यांनी आयुष्यभर लाल दिव्याची सत्तेची उब भोगली, त्या विधानपरिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी या बैठकीकडे पाठ फिरवून साखरवाडीत शिवसेनेचा प्रचार करणे पसंत केले. सत्तेसाठी आणि राजकारणासाठी हे कोणत्या थराला जाऊ शकतात, याचा प्रत्यय आज फलटणकरांना आला आहे," असा घणाघाती आरोप सातारा जिल्हा बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फलटण तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांनी केला आहे.
आज मुंबईत विधिमंडळ नेतेपदी आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून श्रीमती सुनेत्राताई पवार यांची निवड करण्यासाठी विधानसभा व विधानपरिषदेच्या सर्व आमदारांना पाचारण करण्यात आले होते. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी फलटण-कोरेगावचे आमदार सचिन पाटील यांनी तातडीने मुंबई गाठली आणि ठरावाला अनुमोदन दिले.
याउलट, विधानपरिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या बैठकीला जाण्याचे टाळून साखरवाडी (ता. फलटण) येथील शिवसेनेच्या प्रचार सभेला उपस्थिती लावणे पसंत केले. यावर शिवरूपराजे खर्डेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
रामराजेंवर सडकून टीका करताना खर्डेकर म्हणाले, "पवार कुटुंबीयांनी यांना सतत सत्तेत आणि लाल दिव्याच्या गाडीत ठेवले. अनेकदा त्यांनी पक्षाविरोधात भूमिका घेतली, तरीही अजितदादांनी त्यांची विधानपरिषदेची आमदारकी कायम ठेवली. मात्र, आज जेव्हा अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीची, सुनेत्राताईंची निवड होत होती, तेव्हा तिथे उपस्थित राहून ठरावाला अनुमोदन देण्याची साधी 'कृतज्ञता' सुद्धा त्यांना दाखवता आली नाही."
"स्व. अजितदादांच्या निधनाचे दुःख बाजूला सारून केवळ सत्तेच्या हव्यासापोटी आणि स्थानिक निवडणुकीच्या प्रचारासाठी रामराजेंनी मुंबईला जाणे टाळले. यावरून त्यांची निष्ठा कोणाशी आहे आणि सत्तेसाठी ते किती खाली घसरू शकतात, हे आता फलटण तालुक्यातील नागरिकांच्या लक्षात आले आहे," असे मत शिवरूपराजे खर्डेकर यांनी व्यक्त केले.
%20(4).jpeg)
No comments