Breaking News

फलटण येथे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात संपन्न

तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उभारण्यात आलेला आकर्षक देखावा
Tathagata Gautama Buddha's birth anniversary celebrated in Phaltan; A grand procession

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५  - तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा २५८६ वा जयंती महोत्सव फलटण शहरात  मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.   तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समितीने विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले होते.  तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आकर्षक देखावा व सजावट करण्यात आली होती. सायंकाळी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सम्राट अशोक यांच्या प्रतिमांची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती.  शोभायात्रेचा शुभारंभ आयु. तुषार शांताराम मोहिते साहेब (आयकर सह आयुक्त, मुंबई (भारत सरकार)) यांच्या शुभहस्ते यांच्या हस्ते करण्यात आला.

 शोभा यात्रेचा शुभारंभ करताना आयकर सहायुक्त तुषार शांताराम मोहिते, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक अनिल आबाजी अहिवळे व इतर मान्यवर

    दि.२३ रोजी सांयकाळी शोभा यात्रेचा शुभारंभ पंचशील चौक मंगळवार पेठ येथून झाला.  शोभायात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आल्यानंतर, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने सुरुवात केल्यामुळे, शोभायात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे थांबवण्यात आली. मात्र तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समिती व सामाजिक कार्यकर्त्यांनी दि. २४ रोजी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून शोभा यात्रेला सुरुवात करून शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत शोभायात्रा संपन्न केली.

शोभायात्रेत सहभागी ट्रॉलीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांची प्रतिकृती 

शोभायात्रेत सहभागी ट्रॉलीमध्ये चक्रवर्ती सम्राट अशोक यांची प्रतिकृती 

शोभायात्रेत सहभागी ट्रॉलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिकृती 
 शोभायात्रेत सहभागी ट्रॉलीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या सिम्बॉल्सह प्रतिकृती

    शोभा यात्रेत विविध चित्ररथामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या आकर्षक प्रतीकृती व देखावे केल्यामुळे नागरिकांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती. तथागत गौतम बुद्ध जयंती महोत्सवा निमित्त मंगळवार पेठ व महात्मा फुले नगर (म्युनिसिपल कामगार वसाहत) येथील महिलांच्या लेझीम संघाने लेझीमचे सादरीकरण मिरवणूकी मध्ये केले. तसेच फलटण शहरातील विविध ठिकाणी अन्नदान व खीर वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .

No comments