वस्ताद बाळासाहेब काशीद, पत्नी सुनीता व सासूबाईंचे अपघाती निधन
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२८ जानेवारी २०२६ - कुस्ती क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व, स्वराज कुस्ती केंद्राचे वस्ताद तसेच कोळकी ग्राम पंचायतीचे मा.सदस्य व माजी खासदार रणजितसिंह यांचे विश्वासू बाळासाहेब काशीद, पत्नी सुनीता व सासूबाई यांचे सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात जागीच निधन झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण फलटण तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, कुस्ती क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
बाळासाहेब काशीद हे आपल्या कुटुंबासह आपल्या मारुती सुझुकी बॅलेनो कारने प्रवास करत होते. टेंभुर्णी परिसरात हा दुर्दैवी अपघात घडला. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, काशीद यांची कार एका कंटेनर ट्रकला ओव्हरटेक करण्यासाठी बाजूला निघाली होती. दुर्दैवाने, त्याच वेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एसटी बसची आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली.
बाळासाहेब काशीद यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. बाळासाहेब काशीद यांनी 'स्वराज कुस्ती केंद्रा'च्या माध्यमातून अनेक मल्ल घडवले होते. कुस्ती क्षेत्रातील एक निष्णात वस्ताद म्हणून त्यांचा संपूर्ण जिल्ह्यात मोठा दबदबा होता. त्यांच्या अशा अचानक जाण्याने कोळकी गावाने एक कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आणि कुस्ती क्षेत्राचा वस्ताद गमावला आहे.

No comments