Breaking News

गुरुवारी झालेल्या वादळी पावसामुळे फलटण तालुक्यात मोठे नुकसान ; पंचनामे सुरू

Phaltan taluk caused major damage due to heavy rains on Thursday; Panchnama started

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२५ - फलटण शहर व तालुक्यात गुरुवार, दि. २३ रोजी प्रचंड वादळ, वारे, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात झालेल्या पावसात अनेकांच्या राहती घरे, शेड, झोपडी, गुरांचे गोठे वगैरेंचे तसेच उभी पिके, फळझाडे, फळबागा यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान प्रशासनाकडून  नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. 

    महसूल, कृषी, पंचायत समिती, प्रशासन या नुकसानीचे पंचनामे करण्यात व्यग्र असून आगामी २/३ दिवसात पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीची प्रत्यक्ष माहिती हाती येईल. त्यानंतर शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही सुरू करण्याचे सूतोवाच प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

    प्रामुख्याने अलगुडेवाडी, कापडगाव, रावडी खुर्द, मिरेवाडी कुसूर, आंदरुड या भागात आणि परिसरात घरावरील पत्रे उडून जाणे, शेतीमधील उभ्या पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे, तथापि पंचनामे पूर्ण झाल्यानंतर यासह तालुक्याच्या अन्य भागातील नुकसानीची माहिती समोर येईल अशी माहिती तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली.

    अलगुडेवाडी येथे अंकुश तुकाराम जाधव यांच्या घरावरील पत्रा उडून गेला आहे. कापडगाव येथे नाना तात्याबा करे यांच्या घराचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे. आंदरुड येथे धोंडिबा साधू चव्हाण यांच्या घराचा पत्रा उडाला आहे. रावडी खुर्द येथील शेतकरी किशोर अशोक गायकवाड यांचे नुकसान झाले आहे. मिरेवाडी कुसूर येथील यादव कोंडिबा चव्हाण यांचे शेडची पडझड झाली असल्याची माहिती देत हे पंचनामे झाले असून उर्वरित पंचनामे सुरू असल्याचे तहसीलदार डॉ. जाधव यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

No comments