Breaking News

दुष्काळ पाण्याचा की कर्तव्याचा ?

Drought of water or duty?

    या वर्षी निसर्गाने पाठ फिरवल्याने अपेक्षित पर्जन्यमान झाले नाही परिणामी संपूर्ण महाराष्ट्रातच  तीव्र दुष्काळ पडला आहे .या अस्मानी संकटाची झळ जनतेला बसू नये  यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत .

    फलटण तालुका  हा सुध्दा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो . या वर्षीच्या  दुष्काळाची तीव्रता  ही १९७२ पेक्षाही जास्त असल्याचे बुजुर्ग मंडळी सांगत आहेत . अशा परिस्थितीत दुष्काळ  निवारण करण्यासाठी फलटणचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार हे प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अतिरिक्त कामाचा प्रचंड ताण असताना देखील  दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, त्या बाबतीत योग्य त्या उपाययोजना करण्यात कोणत्याही प्रकारची कसर राहू नये म्हणून ते कार्यालयीन वेळ संपूनही रात्री उशीरा पर्यंत आपल्या कार्यालयात बसून काम करत असतात, कदाचित   हे फार थोड्या लोकांना माहीत असावं. 

    परंतु असे कर्तव्य कठोर अधिकारी फलटण तालुक्याला लाभलेले असताना  देखील त्यांच अनुकरण, आपल्या कामात सुधारणा करण्याचे सोडून  त्यांच्या दुष्काळ निवारणाच्या कार्याला दृष्ट लावण्याचे पाप पंचायत समिती मधील काही कर्तव्य पराड:मुख, अजगरा देखील नैराश्य येईल इतके सुस्त  असणारे कामचुकार अधिकारी करताना दिसत आहेत .

    अनेक खाजगी टँकर माफीयांना पोसण्यासाठी काही ठिकाणी जाणीवपूर्वक सुमारे  बारा बारा  दिवस   कृत्रिम  पाणीटंचाई केली जात आहे. अनेक टँकरचे प्रस्ताव तयार करण्यासाठी  हेतुपुरस्सर पणे चालढकल , प्रचंड दिरंगाई केली जात आहे . त्यामुळे यामध्ये काही अर्थ पूर्ण व्यवहार तर होत नाहीत ना ? हे तपासणे आवश्यक आहे . अशा  प्रवृत्तीना    वेळीच आवर घालणे खुपच  गरजेचे आहे . अन्यथा पाण्यासाठी नागरीकांना अन्यत्र स्थलांतरीत होण्याची वेळ येईल. याची सबधितांनी नोंद घ्यावी.

त्यामुळे नेमका दुष्काळ पाण्याचा की कर्तव्याचा? हा  प्रश्न निर्माण होत आहे .

- युवराज शिंदे

No comments