Breaking News

ही निवडणूक देशातील लोकशाही टिकवण्यासाठी महत्वाची आहे - शरद पवार

 

This election is important for maintaining democracy in the country - Sharad Pawar

    दहिवडी (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२९ - महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ दहिवडी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील, जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या संघटनेचे अध्यक्ष सुनील माने,  काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्ष या सगळ्या पक्षांचे सहकारी उपस्थित होते.

    दहिवडी येथील आयोजित सभेत मार्गदर्शन करताना खासदार शरदचंद्र पवार म्हणाले की, या निवडणुकीवर देशाचेच नाही तर जगाचे लक्ष आहे. पाच ते सहा दिवसांपूर्वी बारामती मतदारसंघामध्ये प्रचाराचे नारळ फोडल्याची सभा होती. एका कोपऱ्यामध्ये कोणीतरी न माहितीचे गृहस्थ दिसले. मी चौकशी केली, की हे कोण आहेत? तेव्हा मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून, अमेरिकेमध्ये सर्वात महत्त्वाचं वर्तमानपत्र आहे, त्याचे नाव 'न्यूयॉर्क टाइम्स'.! त्याचे प्रतिनिधी त्या ठिकाणी माहिती घेण्यासाठी आले होते. सभा संपल्यावर मी त्यांची चौकशी केली,  इतक्या लांब तुम्ही आले कसे? तर त्यांनी सांगितलं, की भारताच्या निवडणुकीसंबंधी जगाचे लक्ष आहे, अमेरिकेचे लक्ष आहे. त्यातल्या त्यात ही निवडणूक संघर्षाची कुठे होत असेल तर ती महाराष्ट्रात होत आहे आणि म्हणून मला माझ्या कंपनीने महाराष्ट्रात जायला सांगितले म्हणून मी आलो.  सांगायचं तात्पर्य हे की, ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची झालेली आहे. त्याचे कारण जगातल्या अनेक देशांनी या देशातील लोकशाही बघितलेली आहे. जवाहरलाल नेहरू असो, इंदिरा गांधी असो, लाल बहादूर शास्त्री असो, नरसिंह राव असो, देवेगौडा असो, किंवा डॉ. मनमोहन सिंग असो. या सगळ्यांच्या कालखंडामध्ये एवढा मोठा देश, अनेक भाषा बोलणारे लोक, अनेक राजकीय पक्ष हे सगळं असताना सुद्धा हा देश एकसंघ राहिला आणि या देशातील निवडणुका पार पडल्या. अनेक लोकांचे सरकार या देशामध्ये आली हा या देशातील लोकशाहीचा विजय आहे आणि त्याबद्दलचं औत्सुक्य जगातल्या अनेक लोकांच्या समोर आहे.

    पण यंदाच्या वेळेला स्थिती वेगळी आहे, ती वेगळी का झाली? त्याचे कारण गेले १० वर्ष या देशाची सत्ता नरेंद्र मोदी नावाच्या गृहस्थाच्या हातात गेली. सत्ता देशाची गेली, अपेक्षा अशी होती भाजपाचा प्रधानमंत्री यापूर्वी या देशाने बघितले होते. मला आठवतंय, मी विरोधी पक्ष नेता होतो पार्लमेंट मध्ये, आणि देशाचे प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी होते. अनेक प्रश्नांवर विरोधी पक्ष नेता आणि सत्ताधारी नेता यांना एकत्र बसावं लागतं. काही राष्ट्रीय प्रश्न असतात त्याच्यावर चर्चा करावी लागते आणि एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की वाजपेयी यांनी त्या काळामध्ये कोणताही महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय किंवा देशाचा प्रश्न आला तर सुसंवाद ठेवण्याची आवश्यकता आहे, पहिल्यांदा कोणाची तर विरोधी पक्षाची, आणि त्यासाठी आम्हा लोकांना ते बोलवत असत, चर्चा करत असत, म्हणणे ऐकून घेत असत आणि योग्य तो निर्णय घेत असत. आजचे प्रधानमंत्री यांचा संवादावर विश्वास नाही, कधी ते विरोधकांशी बोलत नाहीत.

    साधी गोष्ट सांगतो की सरकारला साधारणतः दर एक वर्ष झाल्याच्या नंतर त्यांच्या एक वर्षाच्या कारभाराच्या संबंधीचा आढावा पत्रकारांना बोलावून देण्याची पद्धत या देशामध्ये गेल्या अनेक वर्षांची आहे. डॉ. मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना त्यांच्या १० वर्षांच्या काळामध्ये १११ वेळा त्यांनी पत्रकारांना निमंत्रण दिलं आणि आपल्या कामाच्या संबंधीचा आढावा हा त्यांच्यासमोर घेतला. मोदींना प्रधानमंत्री होऊन १० वर्षे झाली. या १० वर्षांत आजपर्यंत एकदाही पत्रकार परिषद घेणं आणि आपल्या कामाचा लेखाजोखा त्यांच्यासमोर मांडणं हे त्यांनी कधी केलं नाही. कारण त्याच्यावर विश्वासच नाही. आम्ही अनेकदा पार्लमेंटमध्ये बघतो की एक महिन्याचं पार्लमेंटचं अधिवेशन पूर्वी काय असायचं? मी बघितलेलं आहे इंदिरा गांधी यांना, राजीव गांधी यांना, नरसिंह राव यांना, मनमोहन सिंग यांना की पार्लमेंटचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर १५ दिवसांचे जर अधिवेशन असेल तर कमीत कमी १२ ते १३ दिवस ज्यांची नावं मी घेतली ते सगळे सभागृहात हजर राहत असत, खासदार बोलतात त्यांची भाषा ऐकून घेत असत. मंत्री उत्तर देतात ते योग्य की नाही? हे जाणून घेत असत. 

    पहिले प्रधानमंत्री असे आहेत मनमोहन सिंग यांच्यानंतर मोदी साहेब की महिनाभर पार्लमेंटचे अधिवेशन आले, तर आमच्या सभागृहामध्ये जास्तीत जास्त एक ते दीड तास, ३० दिवसातील एक ते दीड तास ते सभागृहात येणार, बसणार आणि त्यांचे काही विषय असणार तर बोलणार आणि नंतर निघून जाणार. याचा अर्थ या देशातील संसदीय लोकशाही पद्धतीवर त्यांचा विश्वास नव्हता आणि नाही. त्यामुळे ही निवडणूक देशातील ही लोकशाही टिकवायची की नाही आणि त्याच्यावर ज्यांची श्रद्धा आहे अशा लोकांच्या हातात द्यायची की नाही? याचा निकाल घेण्याच्या बद्दलचा हा सगळा महत्त्वाचा निर्णय या निवडणुकीत घ्यायचा आहे. धैर्यशील यांना मोठ्या मतांनी विजयी करण्याचं काम उद्याच्या निवडणुकांमध्ये करायचं आहे असे आवाहन शरद पवार यांनी करून, आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आले आहात आणि आम्हाला साथ देत आहात याचा मला आनंद आहे. या तालुक्यावर मला एक गोष्ट अतिशय आनंदाने सांगावी वाटते की एकदा मला या वेळेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी उभा असताना तुम्ही लोकांनी मला मनापासून साथ दिली, मोठ्या प्रमाणात मतदान केलं.
तर हे जे तुमचं काम आहे ते माझ्या अंतःकरणात कायम राहील. कधीही संकट आली तर तुम्ही मला हक्काने सांगू शकता असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

No comments