प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यात सहभागी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - संभाजी ब्रिगेड नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर दिनांक १३ जुलै २०२५ रोजी अक्कलकोट, जिल्हा सोलापूर येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या सर्व दोषी समाजकंटकांविरुद्ध तत्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच या प्रकरणाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवून राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेद्वारे सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुका यांच्या वतीने करण्यात आली आहे.
संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुका यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, दिनांक १३ जुलै २०२५ रोजी अक्कलकोट, जिल्हा सोलापूर येथे काही समाजकंटक, दंगेखोर व जातीय तेढ पसरविणाऱ्या प्रवृत्तींनी संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय नेते मा. प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अतिरेकी पद्धतीने शाई फेकून व इतर हिंसक माध्यमातून जीवघेणा हल्ला केला. सदर प्रकार केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर संपूर्ण विचारप्रवाहावर व राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर घातलेला आघात आहे.
हा हल्ला अत्यंत नियोजनबद्ध असून, मागील काही काळात सामाजिक सलोखा बिघडविण्याच्या हेतूने अशा प्रकारचे हल्ले सातत्याने घडत आहेत. त्यामुळे यामध्ये सहभागी असलेल्या सर्व दोषी समाजकंटकांविरुद्ध तत्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच प्रकरणाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवून राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेद्वारे सखोल चौकशी करण्यात यावी.
तसेच, राज्यातील सर्व विचारवंत, कार्यकर्ते व सामाजिक नेतृत्व यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी यंत्रणांना तातडीने निर्देश द्यावेत.
तसेच 1. सदर प्रकरणात सहभागी गुन्हेगारांविरुद्ध भारतीय दंड विधान (IPC) अंतर्गत योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी.
2. हल्लेखोरांविरुद्ध आतंकवादविरोधी कायदा (UAPA) व समाजातील द्वेष पसरविणाऱ्या कायद्यांन्वयेही गुन्हे दाखल करावेत.
3. मा. प्रवीणदादा गायकवाड यांना शासनस्तरीय सुरक्षा कवच तातडीने उपलब्ध करून द्यावे.
4. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यस्तरावर तपास यंत्रणा स्थापन करून प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात.
No comments